पत्रकार: सुधीर घाटाळ,पालघर तालुक्यातील बोरशेती ग्रामपंचायतीत रेशन दुकान नियुक्तीवरून गेल्या काही दिवसांपासून उसळलेला वाद अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. रेशन दुकानदार पद्माकर गजानन सुर्वे यांच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी वारंवार गंभीर तक्रारी नोंदवल्या होत्या.

ग्रामपंचायतीच्या ठरावाकडे दुर्लक्ष करून पुरवठा विभागाने पुन्हा त्यांनाच परवाना दिला. या निर्णयामुळे ग्रामस्थांत प्रचंड संताप निर्माण झाला.१९ सप्टेंबर २०२५ रोजी बोलावलेल्या ग्रामसभेत तब्बल चारशे पेक्षा अधिक ग्रामस्थ उपस्थित राहिले.
संतप्त घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. पुरवठा विभागाचे अधिकारी सभेत हजर असताना ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने ठाम आणि एकमुखी ठराव केला -“सुर्वे यांना कोणत्याही परिस्थितीत रेशन दुकान चालवण्याची परवानगी नको!”ग्रामस्थांचा आक्रोश आणि ठाम भूमिकेसमोर अखेर पुरवठा विभागालाही झुकावे लागले. सभेतच अधिकाऱ्यांनी जाहीर केले की, पद्माकर सुर्वे यांचा रेशन परवाना तात्काळ रद्द केला जाईल.

पुढील पात्र व्यक्तीची निवड नियमानुसार केली जाईल, असा अधिकृत जाहिरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाईल.या घोषणेनंतर ग्रामसभेत समाधान आणि जल्लोषाचे वातावरण पसरले. ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने मिळवलेला हा विजय बोरशेती ग्रामसभेच्या इतिहासात अविस्मरणीय टप्पा म्हणून नोंदला जाणार आहे.

या सभेला ग्रामविकास अधिकारी दीपिका पाटील, सरपंच हरेश भूतकडे, ग्रामपंचायत सदस्य,माजी उपसरपंच गणेश वरठा, रवींद्र वडाली, माजी सरपंच काशीराम वरठा, विष्णू डोंगरकर,गावचे पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबुराव भुतकडे यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण मंडळी, महिला वर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया-
ग्रामस्थांच्या एकमताने सुर्वे यांचे दुकान रद्द करण्यात आले असून त्याची पर्यायी सोय शेजारील गावात केली आहे. नवीन जाहीरनामा आल्यानंतर पुढील तरतूद केली जाईल.
विजय बच्चे – पालघर पुरवठा अधिकारी
प्रतिक्रिया-
ग्रामस्थांच्या भावनांचा आदर करून लवकरात लवकर निर्णय घेऊन संबंधित रेशन दुकानाचा परवाना रद्द करून नवीन जाहीरनामा काढावा, हीच आमची ठाम मागणी आहे.
हरेश भूतकडे -सरपंच ग्रामपंचायत बोरशेत
प्रतिक्रिया –
सुर्वे यांच्या कारभारामुळे महिलांना वारंवार त्रास सहन करावा लागत होता. ते जाणूनबुजून दिवसातून अनेकदा ग्राहकांच्या फेऱ्या करवून घेत होते. त्यामुळे ग्रामस्थांनी एकमुखाने विरोध केला आहे. लवकरात लवकर नवीन जाहीरनामा काढावा, ही आमची ठाम मागणी आहे.
रंजना हाडळ- ग्राहक तथा माजी सरपंच बोरशेती












