पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार व वाडा तालुक्यांतील कुष्ठांतेयांना सामाजिक, आर्थिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने मुंबई येथील अलर्ट इंडिया संस्थेमार्फत गारवा टुरिझम, तवा येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा एचएसबीसीच्या सहकार्याने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या “कुष्ठांतेयांचे सक्षमीकरण व प्रतिष्ठेसाठी सर्वसमावेशक उपजीविका” या प्रकल्पाअंतर्गत घेण्यात आली.
ही कार्यशाळा प्रत्येकी तीन दिवसांच्या दोन बॅचमध्ये आयोजित करण्यात आली होती. पहिली बॅच दि. 19 ते 21 जानेवारी, तर दुसरी बॅच दि. 22 ते 24 जानेवारी 2026 या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडली.
कार्यशाळेचा मुख्य उद्देश कुष्ठांतेयांना त्यांचे मानवाधिकार, घटनात्मक हक्क, सरकारी योजना, सामाजिक सुरक्षा सुविधा तसेच सन्मानपूर्वक जीवनाच्या अधिकाराबाबत जागरूक व सक्षम करणे हा होता. यावेळी भेदभावाविरोधात शांततापूर्ण व विधायक मार्गाने आवाज कसा उठवावा, आरोग्य सेवा व उपजीविकेच्या संधी कशा मिळवाव्यात, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासनाशी समन्वय साधून सामूहिक कृती कशी करावी यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेत चंद्रपूर व गडचिरोली येथील सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थाचे गुणवंत वैद्य, मध्यप्रदेशातील खांडवा येथील प्रगती दिव्यांग सेवा समितीचे रवींद्र चौहान व अॅड. मंजू तंवर, तसेच विक्रमगड येथील हक्कदर्शक संस्थाच्या ममता सांबरे यांनी मार्गदर्शन केले. दिव्यांग व कुष्ठांतेय व्यक्तींचे हक्क, सरकारी योजनांतील अडचणी तसेच हक्कांसाठी प्रभावी वकिली (Advocacy) कशी करावी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. गुणवंत वैद्य व अॅड. मंजू तंवर यांनी प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे केलेले मार्गदर्शन विशेष ठरले.
कार्यशाळेत अलर्ट इंडियाचे कुष्ठरोग कार्यक्रम प्रमुख आशुतोष प्रभावळकर, ज्येष्ठ सल्लागार प्रकाश देवारकर आणि प्रकल्प प्रमुख योगिता परकाळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच पालघर युनिटमधील प्रभाकर जाधव, वैशाली पवार, तुळशीराम भुसारा, विष्णू भुसारा, शंकर ठाकरे व बळवंत दळवी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या दोन्ही कार्यशाळांमध्ये एकूण 45 तरुण कुष्ठांतेयांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणामुळे सहभागींच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली असून समाजात समानतेने व सन्मानाने जगण्याच्या अधिकाराबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.
या उपक्रमाला लाभार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक सहभागी लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणामुळे स्वतःच्या हक्कांविषयी स्पष्टता मिळाल्याचे तसेच सरकारी योजना व सुविधा मिळवण्यासाठी आत्मविश्वासाने पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.
कुष्ठांतेय व्यक्तींनाही समाजात प्रतिष्ठेने, समानतेने व आत्मसन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, हा संदेश या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रभावीपणे पोहोचवण्यात आला. गेली दोन दशके कुष्ठप्रभावितांच्या सेवेत कार्यरत असलेल्या अलर्ट इंडिया संस्थेचा हा उपक्रम पालघर जिल्ह्यातील कुष्ठांतेयांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण व विधायक पाऊल ठरणार आहे.











