होऊ घातलेला आदिवासी आरक्षण बचाव जन आक्रोश मोर्चा यशस्वी होण्यासाठी विविध संघटना, समूह आणि समाजघटक सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आदिवासी शिक्षक फ्रेंडशिप ग्रूप तर्फे मोर्चातील सहभागींसाठी पालघर येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या या आंदोलनाला सहकार्य व पाठबळ म्हणून फ्रेंडशिप ग्रूपने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत हा स्तुत्य उपक्रम राबवला. चारोटी येथून पिण्याचे पाणी पाठवण्यात आले असून त्याचा लाभ मोठ्या संख्येने मोर्चेकऱ्यांना मिळणार आहे.

या उपक्रमावेळी निकणे केंद्रातील आदिवासी शिक्षण विभागातील शिक्षक तसेच आदिवासी शिक्षक फ्रेंडशिप ग्रूपचे अध्यक्ष सुरेश शेलका (केंद्र प्रमुख), शिक्षक नवशू वरखंडे, संजय करबट, दिलीप कोरडे, संतोष अंकाराम, सिताराम कोम, रवींद्र मातेरा, महेश गोकुळे, वंदना बालशी, स्मिता लोखंडे व सर्व फ्रेंडशिप ग्रूप सभासद उपस्थित होते.

आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी समाजातील शिक्षकवर्गाने घेतलेला हा पुढाकार समाजात प्रेरणादायी ठरत असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.











