डहाणू,दि.०१ फेब्रुवारी २०२६,डहाणू तालुक्यातील वधना गावात गुहे परिवाराचा वार्षिक कुळ मेळावा मोठ्या उत्साहात व आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाला. सुमारे १२ वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेल्या या कुळ मेळाव्यास महाराष्ट्र व गुजरात राज्यासह डहाणू तालुक्यातील विविध गावांमधून गुहे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कुळ मेळाव्याचा मुख्य उद्देश कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ करणे, जुन्या आठवणींना उजाळा देणे तसेच नव्या पिढीला कुटुंबाच्या परंपरा, संस्कार आणि आदिवासी सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी समाजाचे दैवत हिरवा व कुलदैवत हिमाय देव यांच्या पूजनाने करण्यात आली.
मेळाव्यात ज्येष्ठ कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. तसेच लहान मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करत एकोप्याचे आणि कुटुंबसंस्थेच्या महत्त्वाचे विचार मांडले.
कार्यक्रमात आदिवासी पारंपरिक नृत्यप्रकार तारपा व धूमसा या नृत्यांवर उपस्थितांनी मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कुळ मेळाव्यास आयोजक वेशू सुकऱ्या गुहे (युट्यूब कलाकार), देवू सुकऱ्या गुहे (युट्यूब कलाकार), सुनील बाळू गुहे, गावप्रमुख रघू गुहे, दामोदर गुहे, विजय लक्ष्मण गुहे (खजिनदार), चंद्रकांत वनश्या गुहे (विस्तार अधिकारी), उमेश गुहे (ग्रामविकास अधिकारी), अरुण गुहे (ग्रामपंचायत सदस्य), मनोहर गुहे, नथूराम गुहे, अमृत गुहे (सुभेदार), साईनाथ गुहे, दुर्गेश हरिचंद्र गुहे, लक्ष्मण घूटे, जयवंत गुहे (नानिवली), मधुकर गुहे (चरी–कोटबी, माजी पंचायत समिती सभापती), अर्जुन गुहे (चारोटी), राहुल गुहे (कोंडगाव), प्रविण गुहे (आंबेदे), रमेश गुहे (रायतळी) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
एकूणच हा गुहे परिवाराचा कुळ मेळावा आनंद, आपुलकी, एकता आणि आदिवासी सांस्कृतिक अस्मितेचा संदेश देणारा ठरला.











