
डहाणू प्रतिनिधी-डहाणू, 02 जानेवारी 2026,वाघाडी भीमबांध येथे युट्युब कलाकार व व्यावसायिक वेशू सुकऱ्या गुहे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शेतकरी वर्ग, विविध युट्युब कलाकार, व्यापारी-व्यावसायिक, परिसरातील ग्रामपंचायतांचे सरपंच व उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी वेशू सुकऱ्या गुहे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व व्यावसायिक कार्याचे मनापासून कौतुक केले. युट्युबच्या माध्यमातून समाजाशी जोडले गेलेले कार्य आणि तरुणांमध्ये असलेली त्यांची लोकप्रियता यामुळे युवक वर्गाचा सहभाग लक्षणीय होता.

वेशू गुहे हे युट्युब कलाकार तसेच व्यावसायिक असल्याने मित्रपरिवार, चाहते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमादरम्यान सामाजिक एकोपा आणि उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. आयोजकांकडून पुढील नियोजनाची माहिती देताना, आगामी काळात आदिवासी वाद्यांच्या तालावर पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमामुळे आदिवासी संस्कृतीच्या जतन-संवर्धनाला चालना मिळणार असून, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे.

या वाढदिवस कार्यक्रमामुळे भीमबांध परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील कार्यक्रमांविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.











