आदिवासी कला संस्कृती साहित्य अकादमी महाराष्ट्र यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, लेखक व अनुजा अवकाश निरीक्षण केंद्राचे संचालक चंद्रकांत घाटाळ यांना ‘आदिसाहित्य जीवन गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल साहित्य व विज्ञान क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

खगोलशास्त्र, विज्ञान प्रसार व आदिवासी साहित्य क्षेत्रात चंद्रकांत घाटाळ यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. विज्ञाननिष्ठ विचार, संशोधनपर लेखन आणि आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत अकादमीकडून त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संस्कृती संमेलनात त्यांच्या विशेष सत्काराचा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम नाशिक येथे दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आद्यक्रांतिवीर देवाजी राऊत साहित्य नगरी, आदिवासी मुलांचे वसतिगृह, पेठ रोड येथे पार पडणार आहे. या सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत घाटाळ सरांचा गौरव करण्यात येणार आहे.
आदिवासी कला संस्कृती साहित्य अकादमी तसेच संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या मार्गदर्शनातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.












