दृष्टी न्यूज संपादक-सुधीर घाटाळ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तर्फे राबविण्यात आलेल्या गोल्डन अवर कॅशलेस रोड ॲक्सिडेंट स्कीममुळे तब्बल ८,३०० लोकांचे जीव वाचविण्यात यश आले आहे. यूनिव्हर्सल सम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि पॅरामाउंट हेल्थ सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स TPA प्रा. लि. यांच्या सहकार्याने ही योजना देशातील दोन सर्वाधिक वर्दळीच्या महामार्गांवर -NH-48 (दिल्ली–मुंबई) आणि NH-44/19 (दिल्ली–आग्रा-कोलकाता) येथे पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात आली.
ही योजना १६ मार्च २०२४ ते १५ सप्टेंबर २०२५ या काळात यशस्वीपणे चालली. अपघातानंतर सर्वात महत्वाचे मानले जाणारे पहिले ६० मिनिटे म्हणजेच “गोल्डन अवर” या काळात रुग्णांना कोणतेही पैसे जमा न करता तातडीने कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्यात आले. या काळात झालेले सुमारे १९ कोटी रुपयांचे सर्व खर्च NHAI ने उचलले, त्यामुळे रुग्णालयांना त्वरित जीवनरक्षक उपचार सुरू करण्याचा विश्वास मिळाला.
या प्रकल्पातून स्पष्ट झाले की, सरकार, विमा कंपन्या आणि TPA यांची योग्य भागीदारी असल्यास आपत्कालीन आरोग्य सेवेचे सुयोग्य व निर्बाध जाळे निर्माण होऊ शकते.
दरम्यान, भारत सरकारने नुकतीच रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ७ दिवसांपर्यंत १.५ लाख रुपयांपर्यंत मोफत कॅशलेस उपचाराची राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. मात्र, गोल्डन अवर स्कीमचे महत्त्व वेगळे आहे. कारण, गोल्डन अवरमध्ये तातडीने उपचार मिळाल्याशिवाय रुग्ण पुढील विस्तारित उपचारांपर्यंत पोहोचूच शकत नाही.
या दोन योजनांचा एकत्रित परिणाम म्हणजे दुहेरी सुरक्षा कवच :गोल्डन अवर स्कीम – रस्त्यावर त्वरित जीवनरक्षक उपचाराची खात्री देते.राष्ट्रीय १.५ लाखांची योजना – पुढील उपचार व पुनर्वसनासाठी आधार देते.
तज्ज्ञांच्या मते, या योजनेचा विस्तार करून ती संपूर्ण गोल्डन क्वाड्रिलॅटरल व इतर अपघातप्रवण महामार्गांवर लागू करणे ही केवळ तार्किक गरज नसून नैतिक जबाबदारी आहे, जेणेकरून अपघातग्रस्तांचा जीव फक्त पैशांच्या किंवा विलंबाच्या कारणाने जाऊ नये.












