पत्रकार सुधीर घाटाळ 9834756487
डहाणू तालुक्यातील रानशेत (भोईर पाडा) येथे दि. १५ फेब्रुवारी, रविवार रोजी आदिवासी भोईर कुळ मेळावा अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. मेळाव्याची सुरुवात भोईर कुळ देवाच्या दर्शनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित बांधवांची नावनोंदणी, तसेच गावानुसार स्वागत व ओळख कार्यक्रम पार पडला. इच्छुक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत भोईर कुळाची एकता, परंपरा आणि आदिवासी संस्कृती जपण्याचे आवाहन केले.

मेळाव्यात मुला-मुलींच्या सांस्कृतिक नृत्य सादरीकरणाने वातावरण रंगून गेले. ढोल व तारप्याच्या तालावर सामूहिक आदिवासी नृत्य (आडवे तूर) करण्यात आले. हिरवा देव, हिमाय, वाघोबा व नारान देव यांच्या स्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. आदिवासी कलाकार दिनेश भोईर यांनी सिने कलाकारांच्या आवाजात मिमिक्री सादर करून उपस्थितांना मनमुराद हसवले.

देव बांधणीसाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल शिवराम भोईर, सखाराम भोईर, वसंत भोईर, कान्हा भोईर व लक्ष्मण भोईर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.दुपारी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व बांधवांनी एकत्र बसून भोजनाचा आनंद घेत सामाजिक एकतेचा संदेश दिला. हा मेळावा केवळ नाच-गाण्यापुरता मर्यादित न राहता, भोईर कुळाची ओळख, इतिहास व आदिवासी संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर भोईर, दिनेश भोईर व परशुराम भोईर यांनी केले, तर मेळाव्यासाठी वर्गणी दिलेल्या सर्व बांधवांचे आभार राजेश भोईर यांनी मानले.पुढील वर्षी म्हणजेच २०२७ सालचा भोईर कुळ मेळावा करसुड गावात आयोजित करण्याचा संकल्प तेथील भोईर बांधवांनी केला.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी भोईर कुळ परिवारातील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्यामुळे भोईर कुळ बांधवांमध्ये एकोपा वाढून सामाजिक बंध अधिक दृढ झाले.











