डहाणू,महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त डहाणू तालुक्यातील वधना रानशेत येथील प्राचीन शिवमंदिरात भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य आचार्य श्री धर्मराज गुरुजी यांच्या सान्निध्यात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला. “हर हर महादेव”च्या जयघोषात आणि वेदमंत्रांच्या निनादात मंदिर परिसर दुमदुमून गेला.

आचार्य धर्मराज गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री महादेवाचे षोडशोपचार पूजन, पुण्याहवाचन व लघुरुद्र पूजन शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाले. त्यानंतर मातृका पूजन, नवग्रह मंडल स्थापना, नांदी श्राद्ध व ईशान्य रुद्र कलश स्थापना हे पारंपरिक विधी मोठ्या भक्तिभावात पार पडले. गुरुजींच्या प्रासादिक वाणी व आशीर्वचनांनी उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधान लाभले.
दुपारी विधिवत हवन पार पडले. त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा लाभ दुपारी १२ ते ३ या वेळेत हजारो भाविकांनी घेतला. मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होती. महिलावर्ग, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी आमदार अमित घोडा, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल जोशी व सचिन शिरसाड यांनी विशेष पुढाकार घेतला. या प्रसंगी आमदार विलास तरे, जि. प. सदस्य जयवंत गुरोडा, भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, जगदीश राजपूत, माजी नगराध्यक्ष मिहीर शहा, भावेश देसाई, समी पीरा, रवींद्र फाटक, शिवसेना तालुका प्रमुख संतोष देशमुख,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विपुल राऊत,माजी जि.प. सदयस अमिता घोडा,जितेंद्र पटेल, हरेश मुकणे, दिलीप घोडा, गीता गुहे,नागेश पाटील, आप्पा भोये, शैलेश राऊत, निवास वरठा, नरेश आहडी, हरेश्वर बोलाडा, अरुण गुहे, दामा बोलाडा,सुदाम चिपात,डॉ. माहेश्वरी, आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रद्धा, परंपरा आणि सामूहिक एकात्मतेचा संगम ठरलेला हा महाशिवरात्री उत्सव वधना रानशेत परिसरासाठी अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरला. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशाच धार्मिक उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.











