दृष्टी न्यूज प्रतिनिधी शैलेश तांबडा –
नवीन तालुका अध्यक्षांच्या निवडीनंतर पक्षातील मतभेद समोर
तलासरी भाजपमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत मतभेदाचे पडसाद उमटताना दिसून आले आहेत. भाजपच्या तलासरी तालुकाध्यक्ष पदी विवेक करमोडा यांची नुकतीच निवड झाली असून, त्यांच्या नियुक्तीनंतर लावण्यात आलेले अभिनंदनाचे बॅनर काही कार्यकर्त्यांकडून हटवण्यात आल्याने स्थानिक पातळीवर गटबाजीचे वातावरण तापले आहे.
करमोडा यांच्या निवडीनंतर समर्थकांनी तलासरी शहर व परिसरात अभिनंदनाचे बॅनर लावले होते. मात्र, हे बॅनर भाजपचे डहाणू विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आणि माजी तालुकाध्यक्ष विनोद मेढा यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांकडून काढण्यात आले. या वेळी “विनोद भाऊ, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हें ” अशा घोषणाही देण्यात आल्या.
या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला असून, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. स्थानिक गटांमध्ये असलेले वर्चस्वाचे संघर्ष आता उघडपणे रस्त्यावर येऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
बॅनर काढण्यामागचे कारण देताना, मेढा समर्थकांनी या बॅनर्स त्यांच्या स्वतःच्या खर्चाने तयार केलेल्या फ्रेमवर लावले गेले होते, असे सांगितले. मात्र, काही स्थानिक कार्यकर्त्यांनी ही बाब फक्त सारवासारव असल्याचे म्हटले आहे.
या घडामोडींमुळे सामान्य नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षाच्या अंतर्गत मतभेदांचा स्थानिक वातावरणावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. या वादावर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कै.मा.आमदार पास्कर धनारे साहेब यांचे पुण्यस्मरणाचे बॅनर लावले होते. त्या ठिकाणी विवेक करमोडा यांचे अभिनंदनाचे बॅनर लावल्यामुळे मूळ बॅनर हटवण्यात आले. आमच्यात कोणताही अंतर्गत वाद नाही. संघटनात्मक बदल होतच असतात, हे काही नवीन नाही.
विनोद मेढा, माजी तालुका अध्यक्ष, भाजप तलासरी
भाजप ही केवळ एक पक्ष नसून आमचा एक परिवार आहे. काही गोष्टी जाणूनबुजून किंवा अनावधाने घडल्या असतील, तरी मला कोणावरही राग नाही. तालुका अध्यक्ष म्हणून माझ्यासाठी सर्व कार्यकर्ते समान आहेत. सर्वांना एकत्र घेऊन पक्ष संघटन बळकट करण्याचे काम मी प्राधान्याने करेन. आगामी काळात डहाणू विधानसभा मतदारसंघात निश्चितच कमळ फुलवू.
विवेक करमोडा, तालुका अध्यक्ष, भाजप तलासरी
