डहाणू,ता. १९ जून २०२५ – डहाणू तालुक्यातील चारोटी, कासा, गंजाड, धानिवरी, तवा, वेती या परिसरात वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, या गंभीर प्रश्नाबाबत शिवसेना डहाणू तालुका अध्यक्ष संतोष पुरुषोत्तम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या पालघर मुख्य अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर वीज पुरवठा पूर्ववत सुरू होण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण दिवस पुरत नाही.

वीज सुरू झाली तरी काही वेळातच पुन्हा बंद होते आणि हा ‘सुरू-बंद’चा लपंडाव अखंड सुरूच राहतो. परिणामी, ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना अंधारात राहावे लागत असून, लहान मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.विशेषतः पावसाळ्यात झाडे-झुडपे आणि वेली वीजवाहिन्यांवर पडल्याने वीज प्रवाह खंडित होतो. मात्र अशा परिस्थितीत महावितरणकडून कोणतीही ठोस व तत्काळ उपाययोजना होत नसल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.

संतोष देशमुख यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला की, “जर लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यामध्ये महावितरणच्या कार्यालयाला टाळेबंदी करण्याचा इशाराही देण्यात आला असून, याची पूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असेल.”या निवेदनप्रसंगी शाखा प्रमुख अतुल नाईक, विभाग प्रमुख राजकुमार गिरी, एकनाथ सोनकळे तसेच युवा उपतालुका प्रमुख सुधीर घाटाळ उपस्थित होते.

डहाणू तालुक्यातील वीजपुरवठा प्रश्नाने आता गंभीर वळण घेतले असून, शिवसेनेच्या या पाठपुराव्यामुळे प्रशासन यावर कितपत तातडीने उपाय करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
