दृष्टी न्यूज संपादक सुधीर घाटाळ डहाणू (रायतळी), 13 जून – रायतळी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षम आणि कर्तव्यनिष्ठ ग्रामसेवक प्रीति बामणे यांची पालघर तालुक्यात बदली झाल्यानंतर गावाच्यावतीने त्यांचा भावनिक निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी अनेक ग्रामस्थांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते.

प्रीति बामणे या मागील पाच वर्षांपासून नवी दापचरी येथून बदली होऊन रायतळीत कार्यरत होत्या. सुरुवातीपासूनच त्यांनी गावातल्या विविध घटकांशी मैत्रीपूर्ण आणि समन्वयी संबंध निर्माण केले. ग्रामपंचायतीतील वाद, कुरघोडी अशा अडचणींच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी संयमित, मवाळ आणि सर्वसमावेशक भूमिका घेत गावाचा सर्वांगीण विकास साधला.

त्यांच्या कार्यकाळात रायतळीत वृक्ष लागवड, अंतर्गत रस्त्यांचे विकासकाम, ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभीकरण, पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी आदी अनेक उपक्रम राबविण्यात आले. पेसा कायदा लाभलेल्या या गावात ग्रामस्थांनी त्यांना संपूर्ण साथ दिली आणि गावाच्या विकासात खारीचा वाटा उचलला.

निरोप समारंभासाठी उपसरपंच रमण भावर, सदस्य भरत सुतार, जिगर भोनर, लक्ष्मण धांगडा, चंदू करमोडा, नैना काठ्या, सुचिता धांगडा, माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात उपस्थितांनी प्रीति बामणे यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
