जव्हार – २२ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शाळा जोडो अभियान कार्यक्रमात एक असामान्य पण प्रेरणादायी क्षण सर्वांच्या मनाला भावून गेला. कुमार रमेश जयराम दिघा, इयत्ता ५ वीचा विद्यार्थी, दोन्ही हातपाय नसतानाही कार्यक्रमात अत्यंत सक्रियपणे सहभागी झाला.खेळ, गाणी, गोष्टी या सर्व उपक्रमांमध्ये रमेशने हसत मुखाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे, तो दररोज दोन ते तीन किलोमीटर अंतर पार करत न्याहाळे येथील शाळेत येतो.
अशा विद्यार्थ्यांच्या जिद्दीकडे पाहिल्यानंतर त्या मुलांना सुद्धा शिकण्याची प्रेरणा मिळावी, जे शारीरिकदृष्ट्या सक्षम असूनही मोबाईल, दारू, सिगारेट, गांजासारख्या व्यसनांच्या काही आहारी गेले आहेत.कार्यक्रमानंतर ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाघ यांनी रमेशला शैक्षणिक साहित्याची गरज असल्याची माहिती दिली. हे स्टेटस हेमंत शिंगडे व इश्वर चंद्रे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केल्यावर, कृषी सहायक सतीज बाविसकर (पोशेरा) यांनी ते पाहून रमेशला मदत करण्याचा निर्णय घेतला.

दिनांक ११ जून २०२५ रोजी बाविसकर यांच्या पुढाकाराने, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाघ, सामाजिक कार्यकर्ते हेमंत शिंगडे, इश्वर चंद्रे तसेच MSW कॉलेजचे विद्यार्थी रमेशच्या घरी गेले. त्यावेळी रमेशला शैक्षणिक साहित्याचा संच शाळेची बॅग, पाण्याची बाटली, वह्या, पेन, कंपास, छत्री, जेवणाचा डबा देण्यात आला.

या मदतीनंतरही पुढे लागणारे शैक्षणिक साहित्य देण्याचे आश्वासन बाविसकर यांनी दिले. यावेळी रमेशच्या अपंगत्वाबाबत कागदपत्रांची माहिती घेण्यात आली व त्याच्या आजीकडून अधिक माहिती विचारण्यात आली.
या उपक्रमातून ग्रामस्थांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी व एका अपंग मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.
