पत्रकार-सुधीर घाटाळ
बंजारा समाजाने महाराष्ट्रात भटक्या जमातींच्या NT-D प्रवर्गातून २% आरक्षण घेतलेले असतानाही आता पुन्हा आदिवासी (ST) आरक्षणाची मागणी केली आहे. या मागणीला आदिवासी सेना प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यने तीव्र विरोध दर्शवला असून याबाबतचे निवेदन आदिवासी सेना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. किरण गायकर (पत्रकार) यांच्या हस्ते मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी पालघर यांच्या मार्फत देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात संविधानाने प्रत्येक जाती-जमातींना आरक्षण दिलेले आहे. अशा परिस्थितीत आधीच आरक्षणाचा लाभ घेत असलेला बंजारा समाज पुन्हा आदिवासी आरक्षणाची मागणी करीत आहे, हे संविधानाच्या चौकटीत बसणारे नाही. आदिवासी समाजात सध्या तब्बल ४५ जमाती समाविष्ट असून त्यांना केवळ ७% आरक्षण मिळते. त्यात आणखी घुसखोरी करून बंजारा समाजाला समाविष्ट करणे अन्यायकारक ठरेल.

आदिवासी सेना प्रतिष्ठानने इशारा दिला आहे की, जर शासनाने आदिवासी समाजाची फसवणूक करून बंजारा समाजाला ST आरक्षण दिले, तर ठाणे, पालघर व मुंबई परिसरात आदिवासी समाज तीव्र जनआंदोलन छेडेल. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्यास शासन जबाबदार राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आदिवासी समाजाची स्वतंत्र संस्कृती व परंपरा जगभरात मान्यता प्राप्त असल्याने त्यांच्या हक्कावर कुठल्याही जातीला घुसखोरी करू देणार नाही, असा ठाम निर्धार निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.













