दृष्टी न्यूज प्रतिनिधी:जितेंद्र टोके
गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे फ्रीज, वॉटर कूलर यांसारख्या उपकरणांचा शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. परिणामी, पूर्वी घरोघरी असणाऱ्या माठाचा वापर झपाट्याने कमी झाला असून, गरिबांचा ‘फ्रीज’ म्हणून ओळखला जाणारा ‘माठ’ आता हळूहळू दुर्मिळ होऊ लागला आहे.
शहरी भागात तर माठ जवळपास नामशेष झाला आहे. ही स्थिती केवळ जीवनशैलीतील बदलाचे प्रतिबिंब नसून, एक पारंपरिक वारसा हरवत चालल्याचे चिंताजनक चित्र आहे. माठ हे केवळ पाण्याचे भांडे नसून भारतीय ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. यामध्ये नैसर्गिकरित्या थंड राहणारे पाणी केवळ स्वादिष्टच नव्हे, तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे उन्हाळ्यात माठाचे पाणी ही गरिबांसाठी दिलासा देणारी गोष्ट होती. मात्र आता, आधुनिक उपकरणांच्या सहज उपलब्धतेमुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे माठाचे महत्त्व कमी झाले आहे. याचा परिणाम थेट कुंभार समाजाच्या पारंपारिक व्यवसायावर झाला आहे. पूर्वी माठ, हंडा, मडकी यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणाऱ्या कुंभारांना आता मागणी अभावी व्यवसाय सोडण्याची वेळ आली आहे. अनेक कारागिरांनी पर्यायी रोजगाराचा मार्ग स्वीकारला असून, या पारंपरिक व्यवसायाचा अस्त होत चालला आहे.
प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दीर्घकाळ पाणी साठविल्यास त्यातून होणारे केमिकल्स शरीरासाठी घातक ठरू शकतात. याउलट, माठातील पाणी नैसर्गिक, शुद्ध आणि थंड राहते. शिवाय माठ हा पर्यावरणपूरक, पुनर्वापरयोग्य आणि जैवविघटनशील असल्यामुळे प्लास्टिकच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि टिकाऊ पर्याय आहे. माठ हे केवळ गरिबांचे भांडे नाही, तर एक संपूर्ण संस्कृती आहे. ही संस्कृती टिकविण्यासाठी शाळा, समाजसंस्था आणि शासनाने एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्थानिक बाजारपेठांमध्ये मातीच्या भांड्यांना प्रोत्साहन देणे, प्रदर्शनांच्या माध्यमातून जनजागृती करणे आणि कुंभार समाजाच्या सक्षमीकरणासाठी सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा-9834756487
