डॉ. गोविंद गारे आदिवासी साहित्य पुरस्कार – २०२५ डॉ. राजू शनवार यांना जाहीर
दृष्टी न्यूज प्रतिनिधी:जितेंद्र टोके
आदिवासी साहित्य क्षेत्रातील एक मानाचा समजला जाणारा ‘डॉ. गोविंद गारे राज्यस्तरीय आदिवासी साहित्य पुरस्कार २०२५’ यंदा डॉ. राजू शनवार यांच्या ‘पोश्यांपोर’ या आत्मकथनास जाहीर झाला आहे. फडकी फाउंडेशन, अकोले (ता. अकोले, जि. अहमदनगर) यांच्या वतीने या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.
या पुरस्काराचे हे चौदावे वर्ष असून, यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक ११ मे २०२५ रोजी अकोले येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातील साहित्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील डॉ. राजू शनवार यांना या सोहळ्यात सन्मानपूर्वक गौरविण्यात येणार आहे.
‘पोश्यांपोर’ हे आत्मकथन केवळ एका व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित नसून, आदिवासी समाजाच्या जीवनशैलीचे, समस्या, संघर्ष आणि आशा-अपेक्षांचे वास्तवदर्शी चित्रण करणारे प्रभावी साहित्य म्हणून समोर आले आहे. डॉ. शनवार यांनी आपल्या लेखनातून आदिवासींच्या उपेक्षिततेविषयी संवेदनशीलतेने मांडणी करत सामाजिक वास्तवाला शब्दबद्ध केले आहे.
फडकी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संजय य. लोहकरे यांनी डॉ. शनवार यांना पत्राद्वारे शुभेच्छा देत पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या पुरस्कारामुळे आदिवासी समाजाच्या अनुभवविश्वाला आणि लेखन परंपरेला मुख्य प्रवाहात स्थान मिळण्यास मदत होणार आहे, असे जाणकार साहित्यिकांनी नमूद केले आहे. ‘पोश्यांपोर’ या आत्मकथनाच्या यशामुळे डॉ. राजू शनवार यांचे कार्य अधिक प्रकाशात आले असून, आदिवासी समाजाच्या कथनशील परंपरेचा सन्मान या निमित्ताने राज्य पातळीवर होणार आहे.
जाहिराती आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा:9834756487
