दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद टोकेपाडा शाळेचे शिक्षक दिपक देसले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला सीड बॉल महोत्सव आता राज्यव्यापी पातळीवर पोहोचला आहे. या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद आणि वाढता सहभाग पाहता, यावर्षी सीड बॉल्सच्या निर्मितीत लक्षणीय वाढ झाली आहे.
या उपक्रमाची सुरुवात २०२२ साली टोकेपाडा शाळेतून झाली. पहिल्याच वर्षी दहा हजार सीड बॉल्स तयार करण्यात आले. दुसऱ्या वर्षी ही संख्या २३ हजारांपर्यंत पोहोचली. तिसऱ्या वर्षी डहाणू, तलासरी आणि पालघर परिसरातील १७ शाळांमधील १८०० विद्यार्थ्यांनी मिळून तब्बल १ लाख १७ हजार सीड बॉल्स तयार केले. यावर्षी हा उपक्रम महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत पोहोचला असून लातूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, रायगड, नवी मुंबई, अमरावती, नांदेड, कोपरगाव आदी भागांत बिया पाठवल्या जात आहेत.
या उपक्रमासाठी टोकेपाडा शाळेतील विद्यार्थ्यांनी बेहडा, आपटा, बहावा, चिंच, लाजरा, रिठा, बेल आदी झाडांच्या बिया स्वतः गोळा केल्या. तसेच वडेश्वर महादेव ट्रस्ट, बडोदा येथून शिवण, रक्तचंदन, ढोरगुंज, लाल गुंज, पांढरी गुंज, खैर, बांस, चिलार, सीताफळ, रामफळ, काशीद, कोसुंब, कांचन, करंज, बोर, अभय, बिबवा, चिंच, कांडोळ, आकेशा यांसारख्या दुर्मीळ बिया मिळाल्या. याशिवाय, वैशाली पाटील यांच्या मार्फत रिठा आणि चिंच याच्या बियाही देणगी स्वरूपात प्राप्त झाल्या.
या उपक्रमात शाळेतील ४६ विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक व स्थानिक ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान लाभले. विशेषतः यामिनी करबट यांनी समन्वयाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. सध्या या बियांची विविध ठिकाणी वाहतूक सुरू असून, या प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे. आतापर्यंत वाघाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक अंभिरे सर, सोनवणे सर, बोर्डी येथील स्मिता ठाकूर, पंकज नरवडे, शशिकांत ईशी यांच्या शाळांमध्येही सीड बॉल्स तयार करण्यात आले आहेत. लिलकपाडा कोसबाड येथून अवघ्या दोन दिवसांत तब्बल २७ हजार सीड बॉल्स तयार करण्यात आले. या उपक्रमाला आनंददायी शनिवार या शासन उपक्रमाशी जोडण्यात आले आहे.
यावर्षी उपक्रमाला आर्थिक पाठबळही मिळाले आहे. बडोद्याचे अखिल देसाई यांनी आर्थिक मदतीचे आश्वासन दिले असून, या उपक्रमावर आधारित सीड बॉल हा मराठी चित्रपट तयार करण्याचाही त्यांचा मानस आहे. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा, कार्यक्षमतेचा विकास व एकत्रित काम करण्याची भावना निर्माण होत आहे. पालघरच्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा उपक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारला असून, पर्यावरण रक्षणाचा एक सकारात्मक आणि हिरवा संदेश देत आहे.

पर्यावरणाचे संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणा बद्दलची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्रातील १०० पर्यावरणप्रेमी शिक्षकांच्या सहकार्याने यंदा तब्बल ५ लाख सीड बॉल्स तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. यासाठी यावर्षी ३२ पेक्षा अधिक जंगली आणि आयुर्वेदिक प्रजातींच्या बियांपासून सीड बॉल तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दिपक देसले, शिक्षक जि. प. शाळा लिलकपाडा, कोसबाड
