दृष्टी न्यूज प्रतिनिधी शैलेश तांबडा
तलासरी शिवसेना डहाणू विधानसभा क्षेत्रातील सामाजिक व राजकीय कार्याला अधिक गती देण्यासाठी तलासरी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन जल्लोषात संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यास पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन शंखे, महाराष्ट्र राज्य आदिवासी जनजाती आयोगाच्या सदस्या वैद्यही ताई वाढन, माजी राज्य मंत्री मनीषा ताई निमकर, डहाणू विधानसभा प्रमुख सुनिल ईभाड, युवा एल्गार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व डहाणू-पालघर विधानसभा संघटक ॲड. विराज गडग, सामाजिक कार्यकर्ते वसंत भसरा तसेच शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना कुंदन शंखे, वैद्यही वाढन आणि ॲड. विराज गडग यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा देत सांगितले की, हे कार्यालय केवळ पक्षाचं नसून जनतेसाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं हक्काचं स्थान आहे. येथून समाजाच्या सर्व स्तरांशी थेट संवाद साधून समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
या जनसंपर्क कार्यालयाच्या स्थापनेमुळे शिवसेनेचा समाजाभिमुख दृष्टिकोन अधिक ठळकपणे समोर येत असून, या उपक्रमामुळे तलासरी व डहाणू परिसरातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती, सहाय्य व मार्गदर्शन मिळणार आहे.

उद्घाटनावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “याआधी कार्यालयाच्या अभावामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागत होतं. आता हे कार्यालय आमच्या संघटित कार्याची सुरुवात ठरेल.”कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले, “हे आमचं हक्काचं ठिकाण आहे. जी व्यक्ती या कार्यालयात येईल, ती कधीच निराश होणार नाही. आम्ही जोमाने सामाजिक व राजकीय कामगिरीला पुढे नेऊ आणि संपूर्ण डहाणू व तलासरी भागात भगवा फडकवू.”

या कार्यालयाच्या स्थापनेत ८०% सामाजिक आणि २०% राजकीय विचारसरणीला प्राधान्य देण्यात आले असून, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, आदिवासी हक्कांचे रक्षण यांसारख्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे.
शिवसेनेचे हे जनसंपर्क कार्यालय डहाणू विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी नव्या आशेचा किरण ठरेल, आणि शिवसेनेच्या कार्यपद्धतीत एक सामाजिक बांधिलकीचा पायाभूत टप्पा ठरेल, असा विश्वास सर्व मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

जाहिराती किंवा बातम्या देण्यासाठी संपर्क करा:9834756487
