दृष्टी न्यूज प्रतिनिधी शैलेश तांबडा
डहाणू – एसटी महामंडळाच्या निष्काळजीपणामुळे डहाणू येथून सायवनकडे निघालेल्या एसटी बसचा टायर अचानक फाटल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि ५२ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.

MH 06 S 8617 क्रमांकाची ही बस डहाणू आगारातून सायवनकडे निघाली होती. संध्याकाळी पाच वाजता बस डहाणू येथून निघाली असता, वाटेत आसवे गावाजवळ अचानक टायर फाटला. त्यामुळे बस रस्त्यातच अर्धवट उभी राहिली. या बसमध्ये लहान मुले, महिलांचा मोठा वर्ग तसेच काही ज्येष्ठ नागरिक प्रवास करत होते. टायर अचानक फाटल्यामुळे बसमध्ये बसलेले प्रवासी घाबरले होते आणि काही प्रवाशांनी तत्काळ खाजगी वाहनांची मदत घेऊन आपली यात्रा पुढे सुरू ठेवली.

ही बस पाहणी केली असता तिचा टायर पूर्णपणे झिजलेला व खराब अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. हे पाहता एसटी महामंडळाने बसची योग्य देखभाल न करता निष्काळजीपणा केल्याचे समोर आले आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्यासारखा हा प्रकार असून, यावर तात्काळ कार्यवाही होणे गरजेचे आहे.

प्रवाशांना बस रस्त्यात बंद पडल्यामुळे प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागले. उकाड्यामुळे त्रस्त झालेले लहान मुलं व वयोवृद्ध प्रवासी तासन्तास उन्हा मध्ये वाहनाची वाट पाहत बसले होते.एसटी महामंडळाने आपल्या गाड्यांची वेळोवेळी देखभाल करून प्रवाशांचा जीव धोक्यात न घालता सेवा पुरवावी, अशी जोरदार मागणी यानंतर प्रवाशांकडून होत आहे.

“मी कामावरून बसमध्ये प्रवास करत असताना आसवे येथे अचानक बस बंद पडली. मी नेहमी वेळेत पोहोचत असतो, पण एसटी महामंडळाचे बसवर दुर्लक्ष असल्यामुळे टायर फुटला आणि मला शेवटी खाजगी वाहना मध्ये पुढचा प्रवास करावा लागला.”
नितेश डबका प्रवासी
