दृष्टी न्यूज प्रतिनिधी शैलेश तांबडा
पालघर, दि. २ मे पालघर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी “आमदार आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक २ मे रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात पार पडणार आहे.

या बैठकीस पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र गावित आणि बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. दोन्ही आमदारांनी ग्रामपंचायत स्तरावरील समस्या थेट ऐकून घेण्यासाठी पुढाकार घेतला असून, स्थानिक नागरिक व सरपंच, ग्रामसेवक यांना या बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीमध्ये तालुक्यातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, वीज, पेंशन, घरकुल योजना तसेच इतर शासकीय योजनांची अंमलबजावणी याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या समस्या व मागण्यांचे निवेदन तीन प्रतींसह तयार करून तहसीलदार कार्यालय, पालघर येथे वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“लोकशाहीत नागरिकांचा आवाज थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. या बैठकीच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचा आमचा उद्देश आहे,” असे आमदार गावित व आमदार तरे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत स्तरावरून होत असलेल्या तक्रारी, लोकांची अडचण व प्रशासनाच्या अनुत्तरदायित्वावर थेट चर्चा होणार असल्यामुळे, ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या सादर कराव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
