दृष्टी न्यूज प्रतिनिधी शैलेश तांबडा
डहाणू-जव्हार मुख्य रस्त्यावरील गंजाड परिसरात गुरुवारी सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. मालवाहू आयशर डंपर (क्रमांक MH AG 6981) स्टिअरिंग फेल झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला आदळला. या अपघातात चालक नवसाहाद खान गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने डहाणूतील खासगी रुग्णालयात दाखल करून नंतर पुढील उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, डंपर डहाणूकडे जात असताना अचानक वाहनाचे नियंत्रण सुटले. गाडी दगडांनी (डबर) पूर्ण भरलेली होती, त्यामुळे झाडावर आदळल्यानंतर केबिन पूर्णपणे चकनाचूर झाली आणि चालक आत अडकून पडला.
अपघातानंतर वाहनातून चालकाला बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाला सुमारे दीड ते दोन तास प्रयत्न करावे लागले. यामध्ये स्थानिक ग्रामस्थांनीही मोठी मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. काही नागरिकांनी गाडीवर चढून स्वतःहून दगड खाली करत मदतीचा हात दिला.

सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अपघातामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे चित्र पाहायला मिळाले.

