दृष्टी न्यूज प्रतिनिधी शैलेश तांबडा
तलासरी – भारतीय जनता पक्षाच्या तलासरी तालुकाध्यक्षपदी विवेक करमोडा यांची नुकतीच नियुक्ती झाल्यानंतर, पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. नविन नियुक्तीचे बॅनर काही कार्यकर्त्यांनी हटवल्याने, पक्षातील अंतर्गत संघर्ष समोर आला.

विवेक करमोडा यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर तलासरी मुख्य चौकात लावण्यात आले होते. मात्र, बुधवारी सकाळी माजी तालुकाध्यक्ष आणि त्यांच्या समर्थकांनी हे बॅनर काढले. घोषणाबाजी करत त्यांनी आपला विरोध नोंदवला, ज्यामुळे पक्षातील वर्चस्ववादाची चर्चा रंगली.
त्यानंतर सायंकाळी, भाजपचे जुने, शिस्तप्रिय व निष्ठावान कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी पुन्हा बॅनर लावले आणि करमोडा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी करमोडा म्हणाले, “भाजप हा केवळ पक्ष नाही तर एक कुटुंब आहे. माझे बॅनर फाडले तरी चालेल, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ नेत्यांचे फोटो असलेले बॅनर फाडणे ही पक्षाच्या सन्मानाला धक्का देणारी कृती आहे.”ते पुढे म्हणाले, “मी या पदावर जनतेच्या सेवेसाठी आलो आहे. पक्षातील सर्व गटांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. गटबाजीमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये.”

या कार्यक्रमाला सुरेश शिंदे (अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य), धर्मा गोवारी (प्रदेश सचिव), संतोष वरठा(कार्यकारिणी सदस्य) यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
