दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल, डोंगराळ आणि दुर्गम भागात असलेल्या जव्हार तालुक्यातील कोगदा गावात राहणाऱ्या २७ वर्षीय डॉ. अजय काशीराम डोके या होतकरू तरुणाने UPSC 2024 च्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर AIR 364 ही घवघवीत यशाची कामगिरी बजावून संपूर्ण जव्हार तालुका, पालघर जिल्हा व संपूर्ण आदिवासी समाजाचा लौकिक उंचावला आहे.
डॉ. डोके हे जव्हार तालुक्यातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिले आदिवासी उमेदवार ठरले असून, त्यांच्या या यशाने ग्रामीण आणि आदिवासी भागातील नव्या पिढीला स्वप्न पाहण्याचं व त्याच्या पूर्ततेसाठी संघर्ष करण्याचं बळ दिलं आहे.या निकालानंतर त्याच्या गावात मिरवणूक काढून गुलाल उधळून आनंद व्यक्त केला व त्याचे आई वडील, भाऊ, मामा, गावातील सर्व मित्र परिवार व तालुक्यातील पोलीस निरीक्षक किशोर मानभवा,सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी व इतर सामाजिक संस्था पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष घरी भेट देऊन त्यांना शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला.

प्रतिकूलतेतून उभारी घेणारा प्रवास कोगदा या दुर्गम गावात जन्मलेले आणि अत्यंत साधनसंपन्नतेअभावी वाढलेले अजय यांचे प्राथमिक शिक्षण कोगदातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर ते शिक्षणासाठी त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हावली इंग्लिश मिडीयम शाळेत गेले आणि ५ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण तेथे पूर्ण केले. अभ्यासातील सातत्य, जिद्द व चिकाटीमुळे त्यांनी मुंबईच्या नामांकित KEM हॉस्पिटल मधून MBBS ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली.
सेवा आणि समाजकार्याचा ध्यास-MBBS पूर्ण केल्यानंतर त्यांनी जव्हारमधील पतंगशाह उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली. सध्या ते मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. डॉक्टर म्हणून काम करत असतानाच, त्यांनी आपल्या सेवेतून ग्रामीण आणि आदिवासी समाजासाठी अधिक व्यापक पातळीवर काम करावं या हेतूने UPSC परीक्षेचा प्रवास सुरू केला.
कुटुंबाचा आधार आणि मार्गदर्शकांचा मोलाचा वाटा डॉ. डोके यांची पार्श्वभूमी अत्यंत सामान्य असून, त्यांचे वडील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी आहेत आणि आई अशिक्षित असूनही त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी मोठा त्याग केला. याशिवाय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार येथील प्रकल्प निरीक्षक यदुनाथ भोये व निवृत्त नायब तहसीलदार कमळाकर कुवरे हे डॉ. डोके यांचे प्रेरणास्थान ठरले. त्यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळेच ही ऐतिहासिक कामगिरी साध्य झाल्याचं त्यांनी नमूद केलं.

डॉ. अजय डोके यांचा भविष्यकालीन दृष्टिकोन “ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्य सेवा, शिक्षण आणि सामाजिक सुविधा यामध्ये आमूलाग्र सुधारणा करणे हे माझं प्रमुख उद्दिष्ट आहे. UPSC अधिकारी म्हणून ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असेन,” असं भावनिक मनोगत डॉ. डोके यांनी व्यक्त केलं.
समाजासाठी दीपस्तंभ या यशाने केवळ कोगदा गावचं नव्हे तर संपूर्ण पालघर जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं आहे. ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डॉ. अजय डोके हे एक प्रेरणास्रोत, आदर्श व दीपस्तंभ ठरले आहेत.डॉ. अजय डोके यांचे संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन होत आहे.
