दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
पालघर: दि.२६ एप्रिल ला पालघर जिल्ह्य़ातील चहाडे येथे ठाणे जिल्ह्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड.इंदवी तुळपुळे, आरोग्य हक्क परिषदेचा पाया महाराष्ट्रात घालणाऱ्या मनिषा गुप्ते, स्त्री मुक्ती चळवळीच्या मार्गदर्शक छाया दातार,मासवण ग्रा.पं सरपंच दर्शना जाधव,चहाडे ग्रा.पं सरपंच विष्णू जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व कष्टकरी संघटनेच्या मधुताई धोडी यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाला.या परीषदेत राज्यभरातून आलेल्या ४०० महीलांनी आपला सहभाग नोंदवला.आदिवासी तारपा नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

मनिषा गुप्ते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आजपर्यंत राज्यातील विविध भागात झालेल्या आठ परिषदेचा थोडक्यात उहापोह केला.तसेच या परिषदेला आंतरराष्ट्रीय पासून ते राज्यपातळीवर कशी सुरुवात झाली याची माहीती दिली.तसेच पालघरमधील परिषदेतून महिला आरोग्य हक्कासंदर्भात वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन होईल याबद्दल खात्री दिली.

परिषदेच्या प्रमुख उद्घाटक श्रीम.इंदवी तुळपुळे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विविध उदाहरणे देऊन देशातील नैसर्गिक साधन संपत्तीच्या र्हासामुळे मानवांच्याच आरोग्यावर परिणाम होत आहे. जंगल, नदी व समुद्र ही नैसर्गिक संसाधने आपले जीवनाधार आहेत. आपण वसुंधरा दिन साजरा करतो पण त्याच वसुंधरेची अवस्था आज काय झाली आहे ? मानवी आरोग्याचा विचार करताना काही बाबीं जसे ब्लडप्रेशर,शुगर,हिमोग्लोबीन इत्यादींच्या मर्यादा ओलांडल्या की आरोग्य बिघडतं तसेच आपल्या पृथ्वीवरील एकूण नऊ मर्यादांपैकी सहा मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत.
पृथ्वीवरील असंतुलीत तापमान,जैववैविध्यतैचे संपत चाललेले अस्तित्व, भूगर्भातील कमी होत चाललेला पाणीसाठा,जमीनीचा असंतुलीत वापर(समुद्रातील भराव, विविध प्रकल्पासाठी वृक्षतोड,डोंगर सपाटीकरण),रासायनिक शेती व मानवनिर्मित प्रदूषण (मायक्रो प्लास्टिक) या सहा मर्यादा ओलांडल्यामुळे पर्यावरण बिघडले असून त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.भारतीय संविधानात म्हटल्याप्रमाणे ‘लोकांनी,लोकांचे, लोकांसाठी चालवलेले राज्य,म्हणजेच लोकशाही.परंतु आज वेगवेगळे प्रकल्प आणताना लोकांना विचारलंही जात नाही.लोकांचा विरोध डावलून विनाशकारी प्रकल्प जनतेवर लादत आहेत.यासाठी महीलांनी आपली ताकद वाढवली पाहीजे. नैसर्गिक साधन संपत्ती जगली तर आपलं आरोग्य जपलं जाईल हा संदेशही या प्रसंगी इंदवी ताईने उपस्थित महिलांना दिला.

श्रीम.छाया दातार यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत तुळजापूर येथे झालेल्या आठव्या आरोग्य हक्क परिषदेचा अहवालाचे प्रकाशन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीम.मधुबाई धोडी यांनी एका खेड्यात राहणाऱ्या आदिवासी महिलेला कार्यक्रमाचे अध्यक्षपद दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. व आरोग्यासारख्या विषयावर पालघर सारख्या आदिवासी जिल्ह्यात परीषद घेतल्याने येथील महिलांना नक्कीच याचा लाभ होईल असे सांगितले.पालघर जिल्ह्यात मोठे हॉस्पीटल नसल्याने येथील गरिबांना गुजरात राज्यात जाऊन उपचार घ्यावे लागतात ही शासनाची उदासीनता आहे.ज्या जंगली झाडापाल्याचा उपयोग आदिवासी औषध म्हणून वापरायचे ती जंगलंच आता नष्ट होत आहेत. यासाठी आम्ही अनेक आंदोलनं व मोर्चे काढले परंतु सरकार विनाशकारी प्रकल्प लादून जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे असेही सांगितले. वर्षा फातरफेकर, सुजाता आयरकर, ज्योती केळकर, विनिता निंबकर आदिंसह स्थानिक संयोजन समितीच्या तसेच शुभदा देशमुख, रंजना कान्हेरे,काजल जैन आदी राज्य समन्वय सदस्यांनी यात सक्रीय सहभाग घेतला.महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद स्थानिक संयोजन समिती, पालघर.
छबिलदास गायकवाड
प्रसिद्धी व जनसंपर्क समन्वयक
महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद , पालघर.
(मो 8983303640)
