दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
कासा गावातील शिव मंदिराजवळील अंदाजे 50 फूट खोल विहिरीत दोन दिवसांपासून अडकून पडलेल्या मांजरीच्या दोन पिल्लांना अखेर प्राणी मित्र आणि वन विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. या धाडसी रेस्क्यू मोहिमेदरम्यान एक मांजर आक्रमक झाली आणि तिने प्राणी मित्र सनी गवळी यांना चावा घेतला. यानंतर त्यांच्यावर तत्काळ घासा येथील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

ही घटना समजताच ग्रामस्थ विशाल पागधरे यांनी तातडीने वन विभाग आणि प्राणी मित्रांना माहिती दिली. काही वेळातच प्राणी मित्र घटनास्थळी दाखल झाले. विहीर खोल आणि अरुंद असल्याने बचावकार्य अत्यंत जोखमीचं होतं. मात्र प्राणी मित्र दानी रावत आणि सनी गवळी यांनी दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरून धाडसाने कार्य सुरू केलं.

मांजरी आक्रमक झाल्यामुळे मोहिमेदरम्यान अडथळे आले. विशेषतः सनी गवळी यांना चावा घेतल्याने त्यांना किरकोळ जखम झाली. तरीही त्यांनी मोहिम पूर्ण करण्याचा निर्धार कायम ठेवला. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही पिल्लांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं.
या मोहिमेत यतीश पुजारी, सनी गवळी, दानी रावत, प्रणय धानमेहेर यांच्यासह वनपाल नितीन कांबळे आणि पद्माकर पवार यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांचं समन्वय आणि धाडस यामुळे ही मोहिम यशस्वी झाली.
गावकऱ्यांनी या सर्व प्राणी मित्रांचे आणि वन विभागाचे आभार मानले असून, ही घटना माणुसकी आणि प्राणीमित्रत्वाचे एक सुंदर उदाहरण ठरली आहे.
