दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू, २७ एप्रिल २०२५ डहाणू तालुक्यातील साखरे, चरी, कोटबी, गोवणे आणि वांणगाव विभागात आज संध्याकाळी साधारण ७.२३ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अचानक झालेल्या या धक्क्यांमुळे परिसरात काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले.भूकंपाचे धक्के काही क्षणांसाठी जाणवले असले तरी अद्याप कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. धक्के जाणवताच स्थानिक नागरिकांनी घाबरून घराबाहेर येत सुरक्षित स्थळी धाव घेतली.
दरम्यान, राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) आणि भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, प्राथमिक माहितीनुसार हा भूकंप सौम्य तीव्रतेचा असल्याचे संकेत मिळाले आहेत.
सध्या नागरिकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. प्रशासनाकडून नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आणि अधिकृत माहितीची प्रतीक्षा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.भविष्यातील कोणत्याही संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहेत.
मी घरात भाजी बनवत होतो. संध्याकाळी साधारण ७.०० ते ७.३० वाजेच्या सुमारास आम्हाला जमिनीचा थरथराट जाणवला. काही सेकंदांसाठी घरं हलल्यासारखी वाटली. सुरुवातीला काय झालं समजलं नाही, पण लगेचच आम्ही सर्वजण घाबरून घराबाहेर आलो. सुदैवाने कोणतीही मोठी हानी झालेली नाही. आम्ही अजूनही सतर्क आहोत.
रवी वरठा, साखरे ग्रामस्थ
