दृष्टी न्यूज प्रतिनिधी शैलेश तांबडा
पालघर :पालघर जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी शनिवारी आपल्या संवेदनशीलतेचे व माणुसकीचे अनोखे उदाहरण घडवले. शैक्षणिक कार्यक्रम आटोपून मनोर मार्गे जव्हारकडे जात असताना, कोसबाड येथील रस्त्यावर दुचाकी अपघात घडल्याचे त्यांना निदर्शनास आले. अपघातग्रस्त महिलेला गंभीर दुखापत झाल्याचे पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या गाडीतून खाली उतरत थेट घटनास्थळी धाव घेतली.

दुचाकीवरून घसरलेल्या महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. घटनास्थळी जमा झालेल्या लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण असताना, डॉ. सवरांनी अत्यंत शांतपणे आणि तातडीने प्राथमिक उपचार केले. डॉक्टर म्हणून असलेले वैद्यकीय ज्ञान वापरून त्यांनी महिलेच्या जखमेवर योग्य उपचार केले आणि तत्काळ तिला जवळच्या रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, “डॉ. सवरा यांची गाडी थांबली आणि ते स्वतः धावत आले. त्यांनी जखमी महिलेला मदत केली. त्यांच्या त्वरित कृतीमुळे मोठा अनर्थ टळला.”

या घटनेनंतर बोलताना डॉ. हेमंत सवरा म्हणाले, “लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून संकटात असलेल्या प्रत्येकाला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मानवतेच्या मूल्यांपेक्षा कोणताही कार्यक्रम मोठा नाही.”

डॉ. सवरांनी स्वतःच्या कार्यक्रमाला दुय्यम स्थान देत अपघातग्रस्त महिलेला दिलेली मदत पाहता नागरिकांमध्ये कौतुकाची लाट उसळली आहे. “खासदार असावा तर असा!” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. उच्च पदावर असतानाही साधेपणा, सेवाभाव आणि तत्परता जपत डॉ. हेमंत सवरा यांनी खऱ्या अर्थाने लोकसेवेचा आदर्श घालून दिला आहे.
बातमी आणि जाहिरातसाठी संपर्क करा:9834756387
