दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
पालघर : मनोर पोलिस स्टेशनचे सफौ/ एन.बी. भाट हे पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथून ड्युटीवर परतत असताना गोवाडे येथे त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. समोरून येणाऱ्या वाहनामुळे त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून गाडी थेट वडाच्या झाडावर आदळली. या अपघातात त्यांच्या दोन्ही हातांना तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली व जवळपास दहा ते पंधरा मिनिटे ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते.

घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी मदत करण्याऐवजी फोटो आणि व्हिडिओ काढण्यात वेळ घालवला. मात्र याच वेळी तेथून जात असलेले मासवण गावाचे पोलीस मित्र राहुल पिंपळे यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ पोलीस पाटील अमर भोईर यांना संपर्क केला. दोघांनी मिळून अपघातग्रस्त भाट साहेबांना मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांच्या तत्परतेमुळे वेळेत उपचार होऊन आज भाट साहेबांची प्रकृती स्थिर आहे.

या कार्याबद्दल मनोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांनी राहुल पिंपळे व अमर भोईर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या या सामाजिक कर्तव्य बजावणाऱ्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.पोनि. रणवीर बयेस यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस पाटलांना आवाहन केले की, अशा अपघात किंवा संकटाच्या वेळी तात्काळ मदत करण्यासाठी पुढे या, कारण आपल्या तत्काळ मदतीमुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. हेच खरे सामाजिक कर्तव्य आणि पुण्यकर्म आहे.
