दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू तालुक्यातील पळे गावात दिनांक २९ एप्रिल २०२५ ते १ मे २०२५ दरम्यान पारंपरिक पद्धतीने वाघोबा गावदेव नवपरीवर्तन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याला गावातील सर्व दहा पाड्यांतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली.
सागाच्या झाडापासून साकारण्यात आलेल्या वाघोबा देवतेची स्थापना आदिवासी समाजाच्या प्राचीन परंपरेनुसार करण्यात आली. गावदेव वाघोबा हा गावाचा रक्षक देव मानला जातो. या निमित्ताने पारंपरिक वाद्य तारपा आणि आदिवासी तुरच्या गजरात वाघोबा देवाचा उदोउदो करण्यात आला.

या सोहळ्यात पळे, लिंगापाडा, कोलपाडा, मानपाडा, गावठणपाडा, दांडीपाडा, भोनरपाडा, नवापाडा, शिरशापाडा, बारीपाडा व वाघईपाडा या दहा गावपाड्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. “पळे जय वाघोबा ग्रुप”च्या पुढाकाराने आणि सर्व गावकऱ्यांच्या एकत्रित नेतृत्वाखाली हा पवित्र कार्यक्रम पार पडला.

गावातील चेडा तोरणी, मखरी चेडा आणि राणीशिवार या पारंपरिक देवतांचीही आधी पूजा करून नविन वाघोबा देवाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या देवतेच्या स्थापनेनंतरच गावामध्ये लग्न समारंभ, साखरपुडा, भात कापणी, नवे कायदे व नवघर बांधकाम सुरू करण्याची परंपरा आहे.

या उत्सवामध्ये अंगात वार घेण्याची प्राचीन पारंपरिक रीतदेखील गावकऱ्यांनी पाळली. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कामाला सुरुवात करणाऱ्या ग्रामस्थांचे विशेष आभार मानण्यात आले.
