संपादक सुधीर घाटाळ पालघर, दि. १९ जुलै २०२५ – तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० एप्रिल २०२५ रोजी घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी समीर महादेव जाधव (रा. पुणे) याला अखेर पालघर पोलिसांनी अटक केली आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी गुन्ह्याच्या २ महिन्यांनंतर आरोपीला शोधून काढत मोठं यश मिळवलं आहे.
या प्रकरणातील फिर्यादी संदीप भैयालाल पारधी हे त्यांच्या स्विफ्ट डिझायर (MH48-CT-7578) या कारने जात असताना उपलाट-कलबटपाडा येथे थांबले. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांची मोटारसायकल कारसमोर आडवी लावून, जबरदस्तीने त्यांना कारच्या मागील सीटवर बसवून अपहरण केले. यानंतर त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, सोन्याची अंगठी व रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल लुटून त्यांना कल्याण बायपासजवळ सोडून देण्यात आले.
या प्रकरणी २९ वर्षीय आरोपी विशाल दत्तात्रय तांदळे यास आधीच अटक करण्यात आली होती आणि त्याच्याकडून ५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. मात्र दुसरा आरोपी समीर जाधव हा फरार होता.
गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, पोलिसांनी १७ जुलै रोजी मंचर, जि. पुणे येथून आरोपी समीर जाधवला अटक केली. १८ जुलै रोजी त्याला डहाणू न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यास ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
तपासादरम्यान समोर आले आहे की, समीर जाधव याच्यावर यापूर्वीही खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, हत्यार बाळगणे अशा स्वरूपाचे १० गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही यशस्वी कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपरा. पोलीस अधीक्षक विनायक नरळे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अजय गोरड, पोउपनि अमोल चिंधे, पोलीस नाईक महेश बोरसा, पोलीस अंमलदार योगेश मुंढे यांनी केली असून, पुढील तपास पोउपनि अमोल चिंधे करत आहेत.












