पत्रकार-सुधीर घाटाळ पालघर, दि. ३ सप्टेंबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या “आदि कर्मयोगी” या राष्ट्रीय अभियानाचा प्रभावी विस्तार आता पालघर जिल्ह्यात होणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील एकूण ६५४ गावांमध्ये आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिली.

जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकदिवसीय अभिमुखता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, डॉ. अपूर्वा बासुर, उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई, मांडवीचे वनसंरक्षक अमित भोसले आदी अधिकारी उपस्थित होते.

झारखंडमधील हजारीबाग येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते “धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान” शुभारंभ झाल्यानंतर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील दूर्वेस-मनोर येथून या अभियानाच्या माहिती, शिक्षण व संवाद (IEC) महिमेला सुरुवात केली.
अभियानाचा उद्देश :
जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी सांगितले की, या अभियानाचा मुख्य हेतू म्हणजे –
तळागाळातील नेतृत्व निर्माण करणे,शासकीय सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे,विकसित भारत २०४७ या ध्येयाच्या दिशेने आदिवासी समाजाला सक्षम करणे,
प्रत्येक गावासाठी ‘ग्राम व्हिजन २०३०’ आराखडा तयार करणे
अभियानाचे तीन गट :या उपक्रमाची अंमलबजावणी खालील तीन महत्त्वाच्या गटांतून होणार आहे.-1)आदि कर्मयोगी – शासकीय अधिकार 2)आदि सहयोगी – शिक्षक, डॉक्टर, व्यावसायिक मार्गदर्शक 3)आदि साथी – स्वयंसेवक, महिला बचतगट सदस्य, आदिवासी नेते, सेवाभावी संस्था, आशा कार्यकर्त्या
पालघर जिल्ह्यात या अभियानांतर्गत ८ तालुक्यांतील ६५४ गावे आणि ३९६ कॅम्पसद्वारे ५४,७७५ लाभार्थ्यांना पायाभूत सेवा (आधारकार्ड, बँक खाते उघडणे इ.) उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत.
स्थानिक नेतृत्वाला चालना :
या अभियानासाठी ९ जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण देण्यात आले असून, ४० ब्लॉक-लेव्हल अधिकारीही या कामात सहभागी होतील. यामुळे सरकार व आदिवासी समाज यांच्यातील विश्वास अधिक दृढ होईल, युवक व महिलांना नेतृत्वाची संधी मिळेल, तसेच स्थानिक समस्यांवर उपाय शोधण्यास मदत होईल, असे डॉ. जाखड यांनी स्पष्ट केले.
सेवा, समर्पण आणि संकल्पाचे त्रिसूत्री तत्त्व :
डॉ. जाखड यांनी सांगितले की, हे अभियान “सेवा, समर्पण आणि संकल्प” या मूल्यांवर आधारित असून, ग्राम कृती आराखडे तयार करणे, स्थानिक संस्कृती व भाषांचे संवर्धन करणे, तसेच वितरणातील तफावत दूर करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.
अभिमुखता कार्यक्रम :
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी नाशिक येथे प्रशिक्षण घेतलेल्या जिल्हा मास्टर ट्रेनर्सची ओळख करून देण्यात आली. तसेच धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाची माहिती आणि २२ ते २५ ऑगस्टदरम्यान झालेल्या प्रशिक्षणाचा आढावा घेण्यात आला.
शेवटी जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी सांगितले की, “आदि कर्मयोगी अभियान ही केवळ योजना नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. पालघर जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी बहुल गावामध्ये या उपक्रमाचा ठसा उमटवला जाईल.”













