उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे संपूर्ण डहाणू तालुक्यात तापमान झपाट्याने वाढत आहे. शहरातील लोक जरी एसी आणि कुलरमध्ये थंडावा शोधत असले, तरी ग्रामीण भागातील तरुण मात्र निसर्गाच्या कुशीत पारंपरिक आणि नैसर्गिक पर्याय स्वीकारत उन्हापासून दिलासा मिळवत आहेत.
रानशेत, वधना, गंजाड, निकणे, पिंपळशेत आदी गावांतील पाटाजवळच्या ठिकाणी तरुणांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. पाण्यात उड्या मारणं, पलटी घेणं, विविध शैलीत झेप घेणं यामुळे परिसरात आनंद, हास्य-विनोद आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. काहींनी तर या क्षणांचे मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओद्वारे चांगलेच शूटिंगही केले.

या नैसर्गिक जलक्रीडेमुळे खऱ्या अर्थाने खेड्यांतील ‘स्विमिंग पूल’ची अनुभूती मिळत आहे. कोणताही खर्च न करता आणि कोणत्याही तांत्रिक सुविधेशिवाय, पाटाचे पाणीच या तरुणांसाठी उन्हातून सुटकेचा सर्वोत्तम मार्ग ठरत आहे. ही आंघोळ त्यांच्या दैनंदिन कष्टांनंतरचा निव्वळ आनंदाचा क्षण असतो.
उन्हाच्या झळांपासून थोडा दिलासा मिळावा म्हणून तरुणांची ही जलक्रीडा आनंददायी ठरत असली, तरी पाण्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अशा साध्या आणि नैसर्गिक गोष्टीतूनही किती आनंद मिळतो, हे या तरुणांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.
“संपूर्ण दिवसभर शेतात कष्ट, आमची घरची काम करून घेतल्यानंतर थोडा वेळ पाटाच्या थंड पाण्यात घालवणं म्हणजे आमचा आनंदच वेगळा असतो.इथे कुठलंही तिकीट नाही, नियम नाहीत, पण मजा मात्र खूपच असते.आमच्यासाठी हेच आमचं ‘खेडेगावाचे स्विमिंग पूल’ आहे.”
दत्तू सगणे – निकणे घाटाळपाडा
