शैलेश तांबडा
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या (NSTFDC व राज्य शासन पुरस्कृत योजना) माध्यमातून १४२ आदिवासी कुटुंबांना स्थलांतरानंतर स्वावलंबनासाठी आर्थिक मदत मिळाली आहे. महामंडळाच्या कोकण विभागीय कार्यालयामार्फत आदिवासी जमातीतील महिला व युवकांना शेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, किराणा दुकान, हॉटेल व्यवसाय, ऑटो रिक्षा, तसेच विविध लघुउद्योग उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महामंडळाच्या मदतीमुळे लाभार्थींनी विविध व्यवसाय सुरू केले आहेत. त्यात राहुल चैत्या कोरडा – कुक्कुटपालन (२ लाख),सुमित्रा शैलेश धांगडा – भाजीपाला व्यवसाय (२ लाख),अशोक बारक्या किंझरे – हॉटेल व्यवसाय (५ लाख),मनसु जणू गांगुर्डे – ऑटो रिक्षा (५ लाख)यांचा समावेश आहे.गुजरात राज्यात होणारे स्थलांतर थांबवण्यात थांबवण्यात काही प्रमाणात यश आले असुन चांगला प्रतिसाद लाभार्थ्यांकडून मिळत आहे. या उपक्रमामुळे आदिवासी बांधवांना नवजीवनाची दिशा मिळत असल्याचे मत शासकीय अधिकारी व्यक्त करत आहेत

“शबरी महामंडळाच्या योजनांमुळे आदिवासी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आपला वैयक्तिक व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करता येत आहे. राज्यशासनाच्या या योजना खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरत आहेत.”
राजेश पवार – महामंडळाचे व्यवस्थापक (कोकण विभाग)
“स्थलांतर थांबवून आर्थिक सशक्तीकरण साधणे हा या योजनांचा मुख्य हेतू आहे.”
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका – लीना बनसोड
“मी विटभट्टीवर मजुरी करत होतो, पण हॉटेल व्यवसाय योजनेच्या मदतीने मला ५ लाखांची आर्थिक मदत मिळाली. आता स्वतःचा व्यवसाय उभा करत आहे, आणि हेच माझं मोठं पाऊल यशाकडे जाणारं आहे.”
अशोक बारक्या किंझरे – शबरी योजना लाभ घेणारा व्यक्ती

