शैलेश तांबडा
पालघर जिल्ह्यातील वाडा-खडकोना गावाजवळ वसलेल्या ऐतिहासिक आशेरीगडावर रामनवमीच्या शुभमुहूर्तावर शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानने इतिहासाची उजळणी केली. प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षात आयोजित केलेल्या विशेष मोहिमेद्वारे, गडाच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणून पाचव्या तोफेचा एक महत्त्वपूर्ण तुकडा यशस्वीरित्या स्थापित करण्यात आला.ही मोहीम शनिवार, मध्यरात्री १ वाजता सुरु झाली. तब्बल साडेसात तास चाललेल्या या मोहिमेत ५५ गडरक्षकांनी सहभाग घेतला. त्यातील ३५ जणांनी रात्रीच गडपायथ्यालगत मिळालेल्या सहा फुटी द्विभागीय तोफेच्या ठिकाणी पोहोचून ती गडावर चढवण्याचे आव्हान पेलले.रामनवमीच्या सकाळी, गडावरील मंदिराजवळ या ऐतिहासिक तोफेचा एक तुकडा यशस्वीपणे स्थापन करण्यात आला. दुसरा तुकडा सध्या गडाच्या अर्ध्या टप्प्यावर असून, लवकरच पुढील मोहिमेद्वारे तोही पूर्णत्वास नेण्यात येणार आहे.
या मोहिमेत दुर्गवेध युवा मराठा फाउंडेशन, दुर्गेश्वर प्रतिष्ठान, बोईसर फ्लायर्स, अखंड सेगवा संवर्धन, शंभुराजे प्रतिष्ठान यांचा मोलाचा सहभाग होता. तसेच गिरीतारा ट्रेकर्स, महेश राऊळ, जगदीश धानमेहेर, सतीश मेहेर यांचे विशेष सहकार्य लाभले.
दुपारी साडेतीनच्या सुमारास गडपायथ्याजवळ सर्व गडरक्षकांनी एकत्र भोजन केले. त्यानंतर महेश दादांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी संस्थांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी पुढील मोहीमेचे आवाहनही करण्यात आले.
ही मोहीम केवळ एक ऐतिहासिक घटनेची पुनरावृत्ती नव्हे, तर गडसंवर्धनाच्या कार्यात नवचैतन्य निर्माण करणारा प्रेरणादायी टप्पा ठरला आहे.
बातम्या व जाहिरात देण्यासाठी:9834756487
