दृष्टी न्यूज प्रतिनिधी:जितेंद्र टोके
तलासरी मुख्य बाजारपेठेतील तलासरी नाका पोलिस चौकीजवळ असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम केबिनमध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एअर कंडिशन यंत्रणेला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, एअर कंडिशन मशीन पूर्णतः जळून खाक झाले. शेजारील निर्मल हॉटेलमधील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात यश आले.
मंगळवारी सकाळी काही नागरिक एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असताना एटीएम केबिनमध्ये अचानक धूर पसरला आणि त्यानंतर एअर कंडिशनमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले. आग लागल्याचे लक्षात येताच एटीएममध्ये उपस्थित सर्वजण घाबरून बाहेर पळाले. काही क्षणांतच धूर संपूर्ण एटीएममध्ये पसरला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. शेजारीच असलेल्या निर्मल हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ हॉटेलमधील अग्निशमन उपकरणांचा वापर केला. त्यांना काही नागरिकांचीही मदत मिळाली. एकत्रित प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली आणि मोठी हानी टळली.

आश्चर्याची बाब म्हणजे, तलासरीतील या एचडीएफसी एटीएमला कुठलाही सुरक्षा रक्षक नेमलेला नाही. त्याचप्रमाणे, बँकेच्या एटीएम केबिनमध्ये अग्निशमन उपकरणही उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत या एटीएमला दोनदा आग लागल्याची घटना घडली आहे. तरीही बँकेने अद्याप कोणतीही सुरक्षा उपाययोजना न केल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास अद्याप सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, एअर कंडिशनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम कसे भयानक ठरू शकतात, याचे स्पष्ट उदाहरण ठरते. या घटनेनंतर एचडीएफसी बँकेने तात्काळ या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन उपकरण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
