दृष्टी न्यूज -जितेंद्र टोके
डहाणू तालुक्यातील आसनगाव येथे दि 15 एप्रिल रोजी नैसर्गिक शेतीविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मंडळ कृषी अधिकारी वानगाव यांच्या पुढाकाराने मौजे-आसनगाव ग्रामपंचायतीच्या परिसरात पार पडला.
कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथील कीटक शास्त्रज्ञ उत्तम सहाने यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीमधील फरक स्पष्ट केला तसेच नैसर्गिक शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या निविष्ठांची निर्मिती कशी करावी, याविषयी सखोल माहिती दिली. यानंतर मंडळ कृषी अधिकारी उमेश पवार यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत असलेल्या योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) नामदेव वाडीले यांनी नैसर्गिक शेतीचे पर्यावरणीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून असलेले महत्त्व उलगडून सांगितले. तालुका कृषी अधिकारी अनिल नरगुलवार यांनी नैसर्गिक शेती आरोग्याच्या दृष्टीने किती फायदेशीर आहे, याबाबत मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी डहाणू जगदीश पाटील यांनीही नैसर्गिक शेतीविषयी आपले विचार मांडले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक राहुल बोरसा यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकारी वानगाव कार्यालयातील सर्व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. शेवटी सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

