दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या खोदकामामुळे घरे तडकल्याचा आरोप करत डहाणू तालुक्यातील गोवणे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रकल्पाचे काम थांबवले असून, नुकसानभरपाई मिळेपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.

प्रकल्पांतर्गत गोवणे गावाजवळ उन्नत मार्गासाठी खांब उभारण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी ३० ते ४० फूट खोल खड्डे खोदले जात असून, दगड फोडण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर सुरू आहे. मात्र, ग्रामस्थांचा आरोप आहे की, रात्रीच्या वेळी गुपचूप भूसुरुंग (ब्लास्टिंग) स्फोट केले जात असून, त्यामुळे परिसरात भूकंपासारखी कंपने जाणवतात. या स्फोटांमुळे गोवणे गावातील दहा ते बारा घरांना भेगा पडल्या असून, काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिकांनी ठेकेदार कंपनीकडे तक्रार केल्यानंतर अभियंत्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी केली. मात्र, नुकसानभरपाईबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळी मंगळवारी आंदोलन करत, काम बंद पाडले आणि माती वाहून नेणाऱ्या गाड्यांची वाहतूकही रोखून धरली.

या आंदोलनाला कष्टकरी संघटनेचे नेते ब्रायन लोबो यांनी पाठिंबा दिला. “स्थानिक प्रशासनाचा व ठेकेदार कंपनीचा गलथानपणा पाहता, गावकऱ्यांची मागणी पूर्णपणे योग्य आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना देखील कडक शब्दांत सुनावले. दुसरीकडे, ठेकेदार कंपनीने भूसुरुंग स्फोट केल्याचे फेटाळून लावत, “यंत्राच्या सहाय्यानेच दगड फोडले जात आहेत,” असा दावा केला आहे.
वाद विकोपाला जाऊ नये म्हणून वाणगाव पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला आहे. सध्या प्रकल्पाचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून, नुकसानभरपाई मिळेपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही. अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे.
गोवणे गावातील घरांना भेगा पडून झालेल्या नुकसानीबाबत तज्ञ अभियंत्यांकडून पुन्हा तपासणी करण्यात येईल. नेमक्या कारणांचा अहवाल आल्यानंतर नुकसानभरपाईचा निर्णय घेण्यात येईल.
विजय मारुती, विभाग प्रमुख-२, ठेकेदार कंपनी
बुलेट ट्रेनच्या कामामुळे माझ्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. आम्हाला लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी. अन्यथा मोबदला मिळेपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही.१९ तारखेला बैठक आहे, आणि आम्ही त्या निर्णयाची वाट पाहत आहोत.
बारक्या वायेडा- स्थानिक रहिवासी (नुकसानग्रस्त)
जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क:9834756487

