दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू तालुक्यातील नरपड येथील साईबाबा मंदिर परिसरात असलेल्या गणेश आनंद कानागल यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर गुरुवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास लागलेली ही आग काही मिनिटांतच भडकली. आगीच्या खोलीत पुठ्ठ्याचा साठा आणि प्लास्टिक खुर्च्या असल्याने आगीने जोर पकडला. घटना घडताच परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ डहाणू अदानी थर्मल पॉवर स्टेशन आणि डहाणू नगर परिषदेच्या अग्निशामक दलांना याबाबत माहिती दिली. काही वेळातच दोन्ही अग्निशामक दलांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

ही आग लोकवस्तीच्या भागात लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे लोळ बाहेर पडताच आजूबाजूच्या घरांमध्ये घबराट पसरली. घटनेनंतर पोलीस, ग्रामपंचायत प्रशासनही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या आगीत घरातील भिंती, काचेच्या खिडक्या आणि पत्र्याच्या छताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही

