दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
शांतता व सुरक्षिततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या डहाणू शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील न्यू राज फार्मा डिस्ट्रीब्युटर्स या औषधाच्या दुकानात शुक्रवारी (ता. २५ एप्रिल) मध्यरात्री घडलेली चोरीची घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. विशेष म्हणजे चोरीचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
डहाणूच्या चंद्रिका हॉटेलच्या रांगेतील न्यू राज फार्मा डिस्ट्रीब्युटर्स औषधाच्या दुकानाचे शटर व दरवाजा तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. सीसीटीव्हीमध्ये अज्ञात चोरटे बिनधास्तपणे दुकानात प्रवेश करताना स्पष्ट दिसत आहेत. या चोरीनंतर परिसरात भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. दुकान मालकाच्या माहितीनुसार, चोरट्यांनी रोख रक्कम चोरून नेली आहे. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे घटनेनंतर दोन दिवस उलटून गेले तरी अद्याप पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार नोंद न झाल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या हातात काहीही कारवाई करण्यासाठी आधार नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब गंभीर मानली जात आहे. या घटनेमुळे डहाणूतील व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भर बाजारपेठेत चोरी होऊनही तक्रार दाखल होत नसेल तर चोरट्यांना अधिक मोकळं रान मिळेल, अशी चिंता अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. “आज न्यू राज मेडिकल, उद्या कुठलंतरी दुसरं दुकान?” असा सवाल स्थानिक व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.

डहाणू शहरातील या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांनी त्वरित पोलिसांत तक्रार दाखल करून या प्रकारातील चोरट्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा अशा घटनांना आळा घालणे कठीण होईल आणि डहाणूच्या शांततेला गालबोट लागेल, असा सूर सध्या शहरात उमटत आहे.
बातमी किंवा जाहिरात देण्यासाठी संपर्क करा-9834756487
