डहाणू,२८ जुलै २०२५पालघर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत “आमदार आपल्या दारी” हा महत्त्वपूर्ण लोकसंपर्क उपक्रम कासा येथील पुण्य आचार्य भिसे हायस्कूल येथे उत्साही वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात विविध गावांमधून आलेल्या शेकडो ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडत सक्रिय सहभाग नोंदवला.या उपक्रमात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, महसूल, वनविभाग, तसेच शासकीय योजनांच्या लाभ आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी त्यांच्या समस्या थेट उपस्थित अधिकाऱ्यांसमोर मांडल्यावर, अनेक प्रकरणांवर तत्काळ निर्णय घेऊन कार्यवाहीचे आदेश दिले गेले.

कार्यक्रमात डहाणूचे प्रांताधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, तहसीलदार सुनील कोळी, तसेच गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांच्यासह विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी ज्या समस्यांचे निवेदन दिले, त्यावर सखोल चर्चा होऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीस सांगण्यात आले.या वेळी बोलताना आमदार मा. राजेंद्र गावित म्हणाले,“जनतेने मोठ्या अपेक्षेने मांडलेले प्रश्न प्राधान्याने सोडवले गेले पाहिजेत. जे प्रश्न प्रलंबित आहेत त्यांचे तात्काळ निराकरण करण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.”

“आमदार आपल्या दारी” या उपक्रमामुळे प्रशासन थेट जनतेच्या संपर्कात येत असून, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्वरित निवारणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यामुळे प्रशासन व जनतेतील संवाद अधिक दृढ होत असल्याचे चित्र या उपक्रमात दिसून आले.कार्यक्रमादरम्यान ३० नागरिकांनी निवेदनासह रजिस्ट्रेशन करून अधिकृतरीत्या आपली मागणी नोंदवली, तर काही नागरिकांनी रजिस्ट्रेशन न करता थेट निवेदन हातोहात दिली. उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व अर्ज नोंदवून घेत कार्यवाहीस गती देण्याचे आश्वासन दिले.
बातम्या किंवा जाहिरात देण्यासाठी संपर्क करा 9834756487













