डहाणू, पालघर तालुक्यातील बऱ्हाणपुर,तवा,घोळ,चारोटि,कासा,अशा अनेक ग्रामीण भागांमध्ये महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांकडून जबरदस्तीने वीज बील वसुली केली जात आहे. विशेषतः या भागातील बहुतांश ग्राहक हे आदिवासी असल्याने त्यांना येणारी वीज बिले परवडणारी नाहीत. आर्थिक अडचणींमुळे अनेक ग्राहक वीज बील भरण्यासाठी टाळाटाळ करतात. मात्र, अशा ग्राहकांना कोणतीही कायदेशीर नोटीस न देता विजेचे कनेक्शन थेट खंडित केले जाते, ही बाब अत्यंत अन्यायकारक आणि चुकीची आहे.याशिवाय, तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीज वाहिन्या आणि खांब मोडकळीस आलेले असूनही महावितरण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याऐवजी केवळ जबरदस्तीने वीज बील वसुलीवरच भर दिला जात आहे. अशिक्षित आदिवासी ग्राहकांची आर्थिक परिस्थिती आणि कायदेशीर अनभिज्ञता याचा गैरफायदा घेत वाढीव वीज बिले लावली जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत.जर लवकरच यावर उपाययोजना केली नाही, तर या मोडकळीस आलेल्या वीज खांबांमुळे आणि तुटलेल्या वाहिन्यांमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा स्थानिक नागरिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागू शकतो.
