दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
वसई – वसई तहसील कार्यालयासमोर भारताचा माक्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा)च्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारपासून सुरू करण्यात आलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. तालुका सचिव काॅ. शेरू वाघ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला.
पहिल्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार, पुरवठा अधिकारी, गटविकास अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याशी तब्बल ६ तास चर्चा केली. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे चर्चा फिसकटली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी पोलिसांच्या मदतीने पुन्हा चर्चा आयोजित करण्यात आली.

या चर्चेमध्ये काही महत्त्वाच्या मागण्यांवर तोडगा निघाला असून रेशनकार्ड, शासकीय दाखले यांसारख्या गोष्टींचे तात्काळ वितरण करण्यात आले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

या आंदोलनाचे नेतृत्व काॅ. शेरू वाघ यांच्यासह मुकणे, लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा काॅ. सिता जाधव, भारती गुजर, पार्वती पाडेकर, मथुरा भोईर, पवित्रा थापड, भारती जाधव, आरती वांगड, सुचिता चव्हाण, बसंती मसार, राजू बोडके, अंकुश खरपडे, संदीप दोंदे यांनी केले.

या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनाला जाग येत काही तातडीच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
बातमी किंवा जाहिरात देण्यासाठी संपर्क करा -9834756487
