दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू (30 एप्रिल २०२५): पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कैनाड वाडुपाडा येथील सायनु जितेश सावर (वय २५) हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गरोदरपणात योग्य सुविधा न मिळाल्यामुळे सायनु आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केला आहे.
सायनु हिचे सासर गंजाड सोमनाथ डोंगरीपाडा येथे असून, पती बोटीवर कामाला तर सासू-सासरे वीटभट्टीवर काम करत असल्याने ती वडिलांकडे राहत होती. सहा वेळा नियमित तपासण्या करूनही प्रसूतीवेळी आवश्यक त्या आरोग्य सुविधा न मिळाल्याने हा दुर्दैवी प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

सोमवारी सकाळी १० वाजता सायनुला प्रसूती कळा आल्याने कैनाडहून खाजगी रिक्षाने सुमारे अंदाजे १० किमी दूर आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, परिस्थिती गंभीर वाटल्याने तिला तत्काळ डहाणू येथील कॉटेज रुग्णालयात हलविण्यात आले.रविवारी दुपारी २ वाजता डहाणू कॉटेज रुग्णालयात सायनुची नॉर्मल डिलिव्हरी झाली. बाळ २.३५० किलो वजनाचे जन्माला आले, पण काही वेळातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाळाचा मृत्यू देह घरी पाठवण्यात आले होते.

त्याच दिवशी सायनुची प्रकृती ढासळू लागली. प्रसूतीवेळी रक्तस्राव झाल्यामुळे तिचा हिमोग्लोबिन केवळ 6.5 इतका नोंदवण्यात आला होता. रुग्णालयाकडून वलसाड येथे रेफर करण्यात आले. मात्र, सरकारी १०८ रुग्णवाहिका येईपर्यंत वेळ गेला. सायंकाळी ५ वाजता रुग्णवाहिका आली, परंतु वाटेतच सायनुचा मृत्यू झाला.
सायनुच्या भावाने प्रशासनावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, “डिस्चार्ज देऊन वेळेत ऍम्ब्युलन्स दिली असती, तर माझ्या बहिणीचा जीव वाचू शकला असता. डहाणू आणि पालघरमध्ये योग्य सुविधा का नाहीत? शासन अजून किती बळी घेतल्यावर जागं होणार?”ही घटना केवळ एका कुटुंबाच्या दुःखाची नसून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. स्थानिक ग्रामस्थ व नातेवाईकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई करावी आणि ग्रामीण भागात आरोग्य सुविधा तातडीने सुधाराव्यात, अशी मागणी केली आहे.
