दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
जिल्ह्यातील युवकांना अळंबी उत्पादन तंत्रज्ञान अवगत होऊन स्वयंरोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड व प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा), पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने वाडा तालुक्यातील ढेकाळे येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला युवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शैक्षणिक सहलीच्या अनुषंगाने, वाडा तालुक्यातील जामघर-नेहरोली येथील कृषि उद्योजक रोहन ठाकरे यांच्या बटण मशरूम युनिटला भेट देण्यात आली. त्यांनी उत्पादन प्रक्रिया, व्यवस्थापन आणि विक्रीसंबंधी सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर पालघर तालुक्यातील सुहास झांबरे यांच्या ढेकाळे येथील युनिटला भेट देण्यात आली. त्यांनी धिंगरी अळंबी उत्पादन तंत्रज्ञान आणि त्याच्या व्यावसायिक संधींबद्दल सविस्तर माहिती दिली. सहलीदरम्यान, कृषि विज्ञान केंद्राच्या गृह विज्ञान शास्त्रज्ञ रुपाली देशमुख यांनी भाताच्या काडावर अळंबी उत्पादन कसे करता येते, यावर विशेष सत्र घेतले. त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्यासाठीच्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.
या शैक्षणिक सहलीसाठी आत्मा, पालघर यांचे आर्थिक सहकार्य लाभले. कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड येथे मागील वर्षापासून अळंबी बीज निर्मिती केंद्र सुरु झाल्याने जिल्ह्यातील युवकांना स्वयंरोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. परिणामी, अनेक युवक अळंबी उत्पादनाच्या व्यवसायातून अर्थार्जन करत आहेत. सहलीत महिला शेतकऱ्यांचा विशेष सहभाग लक्षणीय ठरला. युवा शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना अळंबी उत्पादन क्षेत्रात नवे तंत्रज्ञान अवगत करून देण्यासाठी सहल उपयुक्त ठरली.
कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव आणि आत्मा प्रकल्प संचालक विनायक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे युवा शेतकऱ्यांना अळंबी व्यवसायाची संधी ओळखता आली आणि भविष्यात अधिकाधिक युवकांना या व्यवसायाकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळाली.

