डहाणू अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा, धुंदलवाडी येथे संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार आनंदभाई ठाकूर, सचिव पांडुरंग बेलकर, रोटरी क्लब जुहू बीच व अशलँड ग्रुपच्या सदस्यांच्या उपस्थितीत नवीन इमारतीतील सहा वर्गखोल्यांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
२०१४ पासून रोटरी क्लबच्या माध्यमातून तसेच अशलँड कंपनीच्या CSR फंडातून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात सौरऊर्जा प्रकल्प, शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर, प्ले स्केप एरिया आणि स्वयंपाकघरासाठी स्टीम सिस्टीमची उभारणी करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात २०० विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह आणि मुलींसाठी स्वतंत्र निवासव्यवस्था उभारण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक उल्हास सातवी यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. रोटरी क्लबच्या अध्यक्षा मानसी ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सुविधा जपण्याचे आणि योग्य उपयोग करण्याचे मार्गदर्शन केले. अशलँड ग्रुपचे भूपेश महाले व हरीश चंडक यांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रेरणादायी विचार मांडले.
संस्थेचे अध्यक्ष आनंदभाई ठाकूर यांनी रोटरी क्लब आणि अशलँड ग्रुपच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, भविष्यातही संस्थेच्या वतीने शाळेसाठी सहकार्य व मदतीचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रित नगराळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कांता डावरे यांनी केले.
