प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत जागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
दृष्टी न्यूज प्रतिनिधी: शैलेश तांबडा
डहाणू तालुक्यातील ओसरविरा गावात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत जलसंधारण जनजागृतीसाठी ‘वॉटरशेड यात्रा’ या विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला कृषी विभागातील विविध अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक तारपा नृत्य सादरीकरणाने झाली. आदिवासी परंपरेनुसार रथाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावातून जलसंधारणाचे संदेश देणारी प्रभात फेरी काढण्यात आली. मृदा व जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी फेरीतून जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास बर्वे, तालुका कृषी अधिकारी अनिल नलगुलवार, मंडळ कृषी अधिकारी उमेश पवार (वाणगाव), जगदीश पाटील (डहाणू), ओसरविरा सरपंच नरेश कोरडा, धानिवरी सरपंच शैलेश कोरडा, धरमपूर सरपंच दीपक भगत, बापूगाव सरपंच बोरसा साहेब, गांगोडी ग्रामपंचायतीच्या सरपंच साधना बोरसा, कृषी पर्यवेक्षक विजय लाडे (आंबोली), वाघमारे (कासा), तसेच कृषी सहाय्यक परितोष पाटील, रेडेकर, आंबेकर, वाळवी आणि जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात डब्लु.डी.टी स्टाफ आणि जलसंधारण प्रकल्प समन्वयक पाटील यांचे मोलाचे योगदान होते.

कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रकला, रांगोळी व निबंध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी भात लागवडीच्या यांत्रिकीकरणाबाबत मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
उपविभागीय व तालुका कृषी अधिकारी यांनी आपल्या भाषणात “माथा ते पायथा” या तत्त्वानुसार जलसंधारण कार्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला आणि जलसंपत्तीचे संरक्षण ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर, विद्यार्थी व ग्रामस्थांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. आभारप्रदर्शन कृषी सहाय्यक एस. डी. जाधव यांनी केले.
बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा-9834756487
