डहाणू व तलासरी तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव
दृष्टी न्यूज प्रतिनिधी:जितेंद्र टोके
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) अर्थात सीपीएमचे २४ वे केंद्रीय अधिवेशन दिनांक, ०२ एप्रिल २०२५ ते ०६ एप्रिल २०२५ दरम्यान तामिळनाडूच्या मदुराई येथे लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. या ऐतिहासिक अधिवेशनात ठाणे-पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार कॉ.विनोद निकोले यांची केंद्रीय कमिटीमध्ये निवड करण्यात आली आहे.

डहाणू तालुक्यातून सीपीएमच्या केंद्रीय समितीत निवड होणारे कॉ. विनोद निकोले हे पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. त्यामुळे डहाणू व तलासरी तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. ही निवड केवळ आमदार निकोले यांच्या वैयक्तिक राजकीय वाटचालीचा सन्मान नसून, डहाणू तालुक्यातील आदिवासी समाजाच्या प्रतिनिधीत्वाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली मान्यता आहे. कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, ही निवड आमच्या आंदोलनशीलतेला व लढाऊ कार्यपद्धतीला मिळालेली दाद आहे. यामुळे ग्रामीण व आदिवासी जनतेच्या प्रश्नांना आता अधिक व्यापक पातळीवर मांडण्याची संधी मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर, बुधवार, ०९ एप्रिल रोजी डहाणू येथे आयोजित समारंभात डहाणू तालुका कमिटीतर्फे आमदार कॉ.विनोद निकोले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे कार्याध्यक्ष व ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष कॉ. चंद्रकांत घोरखना, डहाणू तालुका सेक्रेटरी कॉ. रडका कलांगडा, कॉ.लहानी दौडा, कॉ.चंद्रकांत कोंब, कॉ.विजय वाघात, कॉ.कमलेश राबड, कॉ.लक्ष्मण राबड तसेच, उबाठा गटाचे नेते जयेंद्र दुबळा व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

