आठ आरोपी अटकेत, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी लिंकचा संशय
दृष्टी न्यूज प्रतिनिधी : जितेंद्र टोके
बोईसरमधील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ३ कोटी ५६ लाख ६० हजार रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सीबीआय अधिकाऱ्याच्या नावाने धमकावत त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्यात आली. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत बोईसर पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने देशातील तीन राज्यांमधून आठ आरोपींना अटक केले आहे.
बोईसर येथे राहणारे अनिलकुमार आरेकर या ज्येष्ठ नागरिकांना १८ डिसेंबर २०२४ ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत “प्रदीप सावंत” नावाचा इसम विविध मोबाईल क्रमांकांवरून व्हॉट्सअॅप कॉल करून अंधेरी पोलीस ठाण्याचे अधिकारी असल्याचे भासवत धमकावत होता. त्यांचा मोबाईल नंबर बेकायदेशीर “हॅरेसमेंट आणि अॅडव्हरटायझिंग” प्रकरणात सापडल्याचे सांगत, केस सीबीआयकडे वर्ग झाल्याचे भासविण्यात आले. यानंतर सीबीआय पब्लिक प्रॉसिक्यूटर असल्याचे सांगणारा “प्रमोद शंकर भोसले” हा दुसरा इसम फोन कॉन्फरन्सवर जोडण्यात आला. त्याने हे सिक्रेट मिशन असल्याचे सांगून प्रकरण गुप्त ठेवण्याचे आदेश दिले. तसे न केल्यास पाच वर्षांची शिक्षा होईल, पोलिस घरात घुसतील व मुलीला त्रास देतील, अशी भीती अनिलकुमार यांना दाखविण्यात आली. तुम्ही ज्येष्ठ असल्यामुळे या प्रकरणातून बचावासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावे. तेव्हाच तुम्ही वाचू शकला. त्यासाठी तुमच्याकडे असलेल्या बँकेच्या खात्यातील सर्व जमा रक्कम रिझर्व्ह बँक व सीबीआयकडून तपासासाठी आम्हाला द्यावी लागेल. तपास पूर्ण झाल्यावर १० मार्च २०२५ पर्यंत सर्व रक्कम तुम्हाला परत केली जाईल, असा आरोपींकडून बनाव करण्यात आला. भीतीपोटी व प्रकरणातून बचावासाठी आरेकरांनी विविध बँक खात्यांतून ३ कोटी ५६ लाख ६० हजार रुपये आरोपींना ट्रान्सफर केले. मात्र, या प्रकरणात आपली सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आणि या गुन्ह्याच्या गंभीरतेची दखल घेत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलीस व सायबर पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. सखोल तांत्रिक विश्लेषण व तपासानंतर पथकाने नागपूर, गुजरात व बिहार अशा ठिकाणाहून आठ आरोपींना अटक केली. नागपूर येथून मोहम्मद सैफ रिजवान अन्सारी (वय २६), मोहम्मद फैज रिजवान अन्सारी (वय २५), मोहम्मद झोएब रिजवान अन्सारी (वय २०), गुणवंत रामराव मते (वय ३३) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर अंकलेश्वर (गुजरात) येथून झकरीया असरार झोया (वय २५), शोएब मोहम्मद हनिफ शहा (वय २९),रिझवान साबीर हुसैन मलिक (वय ३४) यांना अटक करण्यात आले आणि बाबर मोहम्मद सिराज खान (वय ३०) ह्याला बिहार येथून ताब्यात घेतले. आठ आरोपींपैकी क्र. १ ते ७ आरोपींना दि. १९ एप्रिल २०२५ रोजी न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर आरोपी क्र. ८ याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.आरोपींकडून २२ लाख रुपये गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक शिरीष पवार (बोईसर पोलीस ठाणे) यांनी केले असून, सायबर पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक रुपाली गुंड व त्यांच्या सहकाऱ्यांचेही मोलाचे योगदान राहिले. या फसवणुकीमागे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रॅकेट कार्यरत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, यामध्ये आणखीन आरोपी असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक सखोल चौकशी करत आहेत.
पोलीस विभागाने नागरिकांना अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या, पोलिस किंवा सीबीआयच्या नावाने येणाऱ्या धमकीच्या कॉल्सवर विश्वास न ठेवता, तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा. कोणत्याही गोष्टीची गोपनीयता ठेवण्याचे फसवे दावे हे फसवणुकीचे लक्षण आहे, हे लक्षात ठेवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

बातम्या आणि जाहिरात देण्यासाठी संपर्क करा:9834756487
