संघटनात्मक बांधणीद्वारे शिवसेनेला नवसंजीवनी – वसंत चव्हाण
दृष्टी न्यूज प्रतिनिधी:जितेंद्र टोके
शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे माझे प्रमुख कर्तव्य आहे,” असे मत १३१ बोईसर (अ. ज.) विधानसभा आमदार विलास तरे यांनी व्यक्त केले. नालासोपाऱ्यात आयोजित पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, “संघटना हा कोणत्याही पक्षाचा खरा आधार असतो. आगामी काळात संघटनात्मक बांधणीवर भर देऊन शिवसेनेला नव्या उर्जेसह उभे करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. बैठकीत विविध विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्व मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी कार्यकर्त्यांच्या अडचणी, स्थानिक प्रश्न आणि पुढील राजकीय दिशा यावर सखोल चर्चा झाली.

आमदार विलास तरे म्हणाले, “शिवसेनेच्या ताकदीचा खरा आधार म्हणजे निष्ठावान कार्यकर्ते. त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे ही आमची जबाबदारी आहे.” तसेच, आगामी वसई विरार महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नेतृत्वाला संधी देऊन त्यांचा विकास साधणे आणि शिवसेनेची विचारधारा अधिक बळकट करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे आहे. त्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात विविध विकासकामे व जनसंपर्क उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांना संधी दिल्यास नागरिकांच्या अपेक्षा व गरजांची पूर्तता अधिक प्रभावीपणे करता येईल.असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनी सांगितले की, “संघटनात्मक बळकटी आणि जनसंपर्क वाढवून शिवसेनेला नवसंजीवनी देण्याचा निर्धार केला आहे. पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी जनसंपर्क कार्यालये उभारण्यात येत असून, याद्वारे लोकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत संघटना मजबूत करण्यावर आमचा भर राहणार आहे.” यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही आगामी काळात पक्ष संघटनेच्या माध्यमातून जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचे वचन दिले.

या बैठकीदरम्यान बोईसर विधानसभा समन्वयक म्हणून संजय बिहारी, उप जिल्हा प्रमुख दिवाकर सिंग, अल्पसंख्याक विभाग प्रमुख सलीम आर. खान, युवासेना उप जिल्हा प्रमुख धनंजय मोहिते व नालासोपारा शहर प्रमुख गोपाळ पाटील यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. शिवाय वानोठा पाडा, गोखिवरे, वसई पूर्व, सोपाराफाटा आदी भागातील नवनियुक्त विभाग प्रमुख व शाखा प्रमुख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक बळकटपणा निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
बातमी आणि जाहिरात देण्यासाठी संपर्क करा:9834756487
