दृष्टी न्यूज प्रतिनिधी:शैलेश तांबडा
मंत्रालय, मुंबई : ९ एप्रिल २०२५ पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचा निर्णय आज मंत्रालयात घेण्यात आला. मौजे कुंभवली (ता.व जि. पालघर) येथील सर्वे क्र. १७७५/५७ या जागेवर १५० खाटांचे Employees’ State Insurance Corporation (ESIC) रुग्णालय उभारण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.
या प्रकल्पासाठी लागणारी शासकीय जमीन केवळ १ रुपया नाममात्र शुल्कावर उपलब्ध करून देण्यास महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्यता दिली आहे. मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उच्चस्तरीय बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.ESIC रुग्णालयामुळे जिल्ह्यातील कामगार वर्गाला उच्च दर्जाची आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. यामुळे केवळ आरोग्य सेवा बळकट होणार नाही, तर सामाजिक पुनर्वसनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे विशेष प्रयत्न या रुग्णालयासाठी खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी मागील १० महिन्यांपासून दिल्लीत सतत पाठपुरावा केला. त्यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत निवेदन सादर केले. तसेच जिल्हा प्रमुख कुंदन संखे हे गेल्या २ वर्षांपासून या विषयावर सातत्याने काम करत होते.
या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी इंदुरणी जाखड, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रस्तावित जागेच्या तात्काळ हस्तांतरणासाठी आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या प्रक्रिया त्वरीत सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार असून, नागरिकांना आधुनिक व दर्जेदार उपचारांची सोय मिळणार आहे.
बातमी आणि जाहिरात देण्यासाठी संपर्क करा:9834756487
